उरण नगर परिषदेच्या वतीने जनजागृती
उरण ः प्रतिनिधी
उरण नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत उरण नगर परिषद आयोजित सिंगल यूज प्लास्टिक बंदीच्या विषयावरील जनजागृतीसाठी उरण शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅलीसोबत एन. आय. हायस्कूलचे एनसीसी व आरएसपीचे विद्यार्थी, उरण नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक, दोन, तीनच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या रॅलीत प्लास्टिक बंदीचे पोस्टर घेऊन लोकांना भावतील अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. एनआय हायस्कूलचे शिक्षक एस. एस. पाटील यांनी उत्कृष्टरीत्या बसवलेल्या स्वच्छता पथ नाट्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी चौका-चौकात केले. या रॅलीसाठी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, स्वच्छता अधिकारी महेश लवटे, शिक्षक एस. एस. पाटील, ढवळे, एनसीसीचे एस. जी. पाटील, शिव स्वामी, माय नॉलेज फाऊंडेशनच्या कविता साळुंखे आदींच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.