Breaking News

कळवेतील खारभूमी हडपणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

भूमिपुत्रांचे नेते दशरथदादा पाटील यांची शासनाकडे मागणी

ठाणे ः प्रतिनिधी

कळवे येथील खारभूमीवर राजकीय आशीर्वादाने भूमाफियांनी कब्जा सुरू केला आहे. या भूमाफियांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संघर्ष कृती सेवासंस्थेचे संस्थापक दशरथ पाटील यांनी खारभूमी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता स्मिता घोडेस्वार यांना निवेदन देताना केली.

या वेळी दशरथ पाटील यांच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना कळवा वपोनि. आव्हाड यांनीही खारभूमी विभागाने लेखी तक्रार करावी, आम्ही भूमाफियांवर गुन्हा नोंदवून घेऊ असे स्पष्ट केले.

दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली, भूमाफियांनी जमिनीवर केलेल्या कब्जाविरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी सोमवारी (दि. 18) कळवे येथील खारभूमी विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर शेकडो शेतकर्‍यांनी निदर्शने केली. ‘महाराष्ट्र सरकारचा निषेध असो, भूमिपुत्र शेतकर्‍यांच्या एकजुटीचा विजय असो, भूमाफियांवर कारवाई करा’, अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी नगरसेवक उमेश पाटील, गजानन पवार, राकेश पाटील, मनोज पाटील, सिकंदर केणी, वसंत पाटील, दशरथ म्हात्रे, नंदा पवार, कृष्णा भगत, रवी पाटील, रचना पाटील, रवींद्र कोळी आदींसह शेकडोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कळवे येथील खारभूमी योजना 1951साली तयार करण्यात आली.1953साली शेतकर्‍यांना कायमस्वरुपी फरोख्त खत तयार करण्यात आले. त्याची 90 टक्के रक्कमेचा भरणा झाला आहे, तर 1954 ते 1978पर्यंत शेतसारा भरण्यात आला. पुढे अल्पभूधारक झाल्या कारणाने शेतसारा माफ झाला. खारभूमी कमिटीचे चेअरमन गोपाळ पाटील यांच्यामार्फत भूमिपूत्र शेतकर्‍यांना 95 एकर सुपूर्द करण्यात आली. त्यापैकी 2011 साली जिल्हाधिकार्‍यांनी राज्य शासनाला अहवाल दिला. या अहवालामध्ये खारभूमीच्या 37 एकर जमिनीवर शेतकरी विलायती गवत लागवड करून उदरनिर्वाह करीत आहेत. यामुळे सरकारने न्यायाच्या दृष्टीने जिल्हाधिकार्‍यांच्या शिफारशीनुसार व न्यायालयीन आदेशानुसार नव्या मुंबईच्या धर्तीवर 12.5 टक्के भूखंड द्यावा, खारजमिनीची धूप टाळण्यासाठी बांदबंदिस्ती करण्यात आली. शेतकर्‍यांकडून फरोख्त खतही घेण्यात आले. 1960 साली खारबोर्ड रद्द झाले.

यामुळे बांधबंदिस्तीवरील खर्च व ड्रेनेजच्या पाण्यामुळे काही शेतजमिनीवर लागवड करता आली नाही, असे असताना शेतकर्‍यांना विश्वासात न घेता जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार 1985 साली सदर खारभूमी जमीन पाटबंधारे विभागाला हस्तांतरित करण्यात आली. 2012 साली या खारभूमीचे विविध संस्थांना वाटप करण्यात आले. मुदत संपल्यानंतरही विविध संस्थांच्या नावे ही जमीन असून आता खारभूमीच्या जागेवर अतिक्रमण केले आहे.

भूमिपूत्रांच्या खारभूमीवर अतिक्रमण करणार्‍या या भूमाफियांवर प्रशासनाने जर 10 मेपर्यंत कारवाई न केल्यास 25 मेपासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही दशरथदादा पाटील यांनी दिला आहे.

…तर बेमुदत उपोषण करणार!

भूमिपूत्रांच्या खारभूमीवर अतिक्रमण करणार्‍या या भूमाफियांवर प्रशासनाने जर 10 मेपर्यंत कारवाई न केल्यास 25 मेपासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही दशरथ पाटील यांनी दिला आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply