पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडको महामंडळातील अधिकारी व कर्मचार्यांसाठी बेलापूर येथील सिडको भवन येथेे माहिती अधिकार अधिनियम 2005 विषयक दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांच्या प्रशासकीय कारभारामध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सन 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा पारित करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीरीत्या व्हावी म्हणून सर्व शासकीय कार्यालयांत व विभागांमध्ये जन माहिती अधिकार्यांची नेमणूक करण्यात येते. सिडकोतील जन माहिती अधिकारी, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांना माहिती अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता 3 व 4 ऑक्टोबर रोजी सिडको भवन येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये यशदा प्रशिक्षण संस्थेतील तज्ज्ञ संदीप सावंत यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांना माहिती अधिकार कायद्याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.