भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप
कर्जत : बातमीदार
हिंदू देवस्थानाची जमीन ही सलीम या मुस्लिम व्यक्तीच्या नावे झाली आणि त्यानंतर ती जमीन लगेचच महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याच्या कुटुंबाच्या नावावर झाली असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे नाव न घेता केला. ते कर्जतमध्ये जमिनीसंदर्भात माहिती घेण्यासाठी गुरुवारी (दि. 20) आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवरही टीका केली.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घोटाळेबाज, भ्रष्ट नेत्यांची पोलखोल करीत आहेत. आता भाजपच्या विरोधात सतत बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक हे सोमय्या यांच्या निशाण्यावर आले आहेत. मलिक यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत भाजपच्या आमदारांवर राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्यांवरून आरोप केले होते. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मालिक यांना धारेवर धरले आहे.
कर्जत तालुक्यात तिसर्यांदा आलेल्या किरीट सोमय्या यांनी आधी वैजनाथ येथे जाऊन तलाठी कार्यालयात कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कर्जत तहसील कार्यालयात त्यांनी तहसीलदारांसोबत चर्चा केली आणि डी-मार्ट येथे पोहचले. तालुक्यातील वैजनाथ येथील शिवालय असलेले हिंदू देवस्थान जमीन घोटाळाप्रकरणी सोमय्या यांनी नवाब मलिक यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केलेत.सोमय्या हे एवढ्यावर थांबले नाहीत, तर ठाकरे सरकारचे काम हे सरकारी पैसा लाटणे, घोटाळे करणे असे असल्याचे म्हणत शिवसेनेची गुंडगिरी मान्य करणार नसून आपण याच जागेवर पुढच्या आठवड्यात आंदोलन करणार असल्याचेही जाहीर केले. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर असणारे शिवसेनेचे कार्यालय आणि येथील जमीनप्रकरणीदेखील त्यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा साधला.
कर्जत तालुक्यात ठाकरे कुटुंबाचीही जमीन असून एकच सातबाराच्या दोन जमिनी कशा असा सवाल करीत स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सोमय्या हे माहिती मिळवित होते. शिवाय आता तालुक्यात ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे बडे नेते म्हणजेच नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या हिंदू देवस्थानची जमीन घोटाळाप्रसंगी ते तालुक्यात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत आहेत.