Breaking News

प्लास्टिकमुक्त वसुंधरा अभियानाला झोकात सुरुवात

भारत विकास परिषदेचा एक अभिनव उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर, महापौरांकडून कौतुक

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेने पर्यावरण संरक्षणाबद्दल जनजागरण करण्यासाठी एक अभियान हाती घेतले आहे. 2 ऑक्टोबर रोजी या प्लास्टिकमुक्त वसुंधरा मोहिमेचा आरंभ झाला. पनवेल, नवीन पनवेल येथील चार मुख्य भाजी बाजारांसमोर जनजागृती स्टॉल्स लावून परिषेदेच्या अनुयायांनी बाजारात भेट देणार्‍या नागरिकांकडून आजनंतर मी एकल वापर प्लास्टिक वापरणार नाही व कोणाला प्रोत्साहितही करणार नाही अशी शपथ दिली. ज्यांनी ही शपथ घेऊन ह्या अर्थाचे प्रतिज्ञापत्र नाव व मोबाईल नंबर माहितीसह सही करून दिले त्यांना भारत विकास परिषदेतर्फे एक मजबूत कापडी पिशवी भेट दिली गेली.

देवी दुर्गामाईच्या मंडपासमोर तन्वी भांबूरकर यांनी पहिल्या प्रतिज्ञापत्रावर सही करून या मोहिमेचा शुभारंभ केला व दुपारी 12.30 वाजता एकूण 1,350 शपथपत्रांवर सही घेऊन त्या दिवसाच्या या मोहिमेची सांगता झाली. पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी परिषदेच्या स्टॉल्सना भेट देऊन या अभिनव संकल्पाचे कौतुक केले व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही छत्रपती शिवाजी चौक येथील स्टॉलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. स्टॉलला भेट देऊन प्रतिज्ञापत्र देणार्‍या सर्व नागरिकांनी या मोहिमेचे कौतुक केले व ही मोहीम अशीच पुढे सुरू राहावी म्हणून सढळ हाताने देणग्याही दिल्या. ही मोहीम सहकार तत्त्वावर पूर्ण ऑक्टोबर महिना चालवून 25,000 नागरिकांना शपथ देण्याचा भारत विकास परिषदेचा मानस आहे, असे पनवेल शाखेचे अध्यक्ष गिरीश समुद्र यांनी सांगितले.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply