मोदी सरकार देणार 10 हजार अॅडव्हान्स
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना व लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 12) सरकारकडून करण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती दिली. यात केंद्र सरकारने चार योजना जाहीर केल्या असून, उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचार्यांना 10 हजार रुपये अॅडव्हान्स देण्याची घोषणा केली आहे.
अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी वस्तूंना मागणी वाढणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. केंद्र सरकारने खरेदीशक्ती वाढवण्यासाठी चार पावले उचलली आहेत. यात पहिले पाऊल म्हणजे केंद्रीय कर्मचार्यांना एलटीसीच्या ऐवजी कॅश व्हाऊचर्स दिली जाणार आहेत.
दुसरे म्हणजे कर्मचार्यांना सण-उत्सवांसाठी 10 हजार रुपये अॅडव्हान्स दिले जाणार आहेत. कर्मचारी ही रक्कम 10 हफ्त्यामध्ये जमा करू शकणार आहेत. मार्च 2021पर्यंतच ही योजना लागू असणार आहे. राज्यांना 50 वर्षांपर्यंत
12 हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील खर्चाव्यतिरिक्त पायाभूत विकासावर 25 हजार कोटी अतिरिक्त खर्च करण्यात येणार आहेत.
राज्यांना बिनव्याजी कर्ज
केंद्र सरकार राज्यांना बिनव्याजी कर्ज देणार आहे. भांडवल वाढवण्याचा अर्थव्यवस्थेवर अनेक पटींनी परिणाम होतो. याचा चालू काळातील जीडीपीवरच नाही, तर भविष्यातील जीडीपीवरही परिणाम दिसून येतो. त्यामुळे राज्यांना 50 वर्षांसाठी 12 हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज भांडवली खर्चासाठी देण्यात येईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वेळी सांगितले.