खालापूर ः प्रतिनिधी
तालुक्यातील दस्तुरी येथून चोरीला गेलेली म्हैस कत्तल करून मांस नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. दस्तुरी येथील शेतकरी भाऊ बाबू शेडगे यांनी म्हैस चोरीला गेल्याची तक्रार खोपोली पोलीस ठाण्यात दिली होती. मंगळवारी म्हशीची कत्तल करून तिचे मांस घेऊन अज्ञात चोरटे पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत. खालापूर तालुक्यातील धनगर समाज दूध व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दुभत्या गाई, म्हशी आहेत. मुंबई -पुणे जुन्या महामार्गावर दस्तुरीजवळ घडलेल्या घटनेने शेतकरी भाऊ शेडगे यांचे मोठे नुकसान झाले असून या घटनेने तालुक्यातील दूध व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.