पनवेल : प्रतिनिधी
महानगर पालिकेत सत्ताधारी पक्षाने विकास कामाचा धडाका सुरू केल्याने राजकारण करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विकासकामात खोडा घालण्यास सुरुवात केली असल्याचे नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या वक्तव्यावरून दिसत असल्याचे भाजपचे प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांनी सांगितले.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत वडाळे तलावाच्या सुशोभीकरणासाठी 12 कोटीची निविदा काढण्याच्या प्रस्तावाला नगरसेविका हेमलता गोवारी यांनी विरोध करताना जनतेचा पैसा टीआयपीएल कंपनीच्या घशात घालण्याचा पनवेल महापालिका प्रयत्न करीत असल्याचा खोटा आरोप करीत पालिकेच्या या कारभाराविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. त्याबाबत भाजपचे प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांनी माहिती देताना सांगितले की टीआयपीएल कंपनीने या कामाची कोणतीही निविदा भरलेली नाही. वडाळे तलावाचे सुशोभीकरण कसे असेल याबाबत 17 जानेवारी रोजी झालेल्या महासभेत स्क्रीनवर आराखड्यासहीत माहिती देण्यात आली होती. त्या वेळी कोणाही सदस्याने त्याला विरोध न करता समती दर्शवली होती. 1 मार्चच्या स्थायी समितीत उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी याबाबत हेमलता गोवारी यांना पूर्वीच्या नगर परिषदेच्या काळात काढलेल्या टेंडरप्रमाणे निविदा मागवल्यास नागरिकांना तेथे फिरण्यास प्रवेश फी भरावी लागेल. त्यामुळे सामान्य माणसाला कसा आर्थिक भार पडेल याचीही माहिती दिली.
स्थायी समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, बबन मुकादम, हरेश केणी व इतर विरोधी पक्षाचे सदस्य उपस्थित होते. त्यांनीही याबाबत विरोध न करता या प्रस्तावाला मान्यता दिली. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना समजावण्याचे प्रयत्न केले तरीही हेमलता गोवारी यांनी 1 मार्चच्या बैठकीत आपला विरोध नोंदवण्यास सांगून आपल्याला सामान्य माणसाबद्दल काही ही देणे-घेणे नसल्याचे दाखवून दिले. त्या पनवेलच्या विकासाच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावरून दिसून येत आहे. टीआयपीएल कंपनीने कोणतीही निविदा भरलेली नसताना या कामाशी त्यांचा कोणताही संबंध नसताना लोकांच्यात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. यामधून त्यांचे अज्ञान मात्र दिसून येत आहे. असा टोलाही बिनेदार यांनी लगावला.