Breaking News

विषारी दृष्टिकोन

कोरोना विषाणूच्या महासाथीची दुसरी लाट अवघ्या देशाचे कंबरडे मोडते आहे आणि त्याच वेळेला काही राजकीय पुढार्‍यांना त्यातही राजकारण सूचते ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी पंतप्रधानांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन बैठकीच्या वेळी आले. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हात जोडून पंतप्रधानांकडे मदतीचा धावा केला. केजरीवाल यांचा हा टाहो प्रामाणिक असता तर बरे झाले असते. कारण आपले सारे भावनावश भाषण केजरीवाल यांनी समाजमाध्यमांवर लाइव्ह प्रक्षेपित केले!

किमान कोरोना महासंकटाबाबत तरी कुणीही राजकारण करू नये. मदत शक्य नसेल तर किमान गप्प बसावे एवढीही अपेक्षा सामान्य नागरिकांना या बोलभांड पुढार्‍यांकडून ठेवता येत नाही. संपूर्ण देश कोरोनाशी संघर्ष करतो आहे. महाराष्ट्रात तर हाहाकार उडाला आहे. विषाणूच्या बाधेमुळे आजारी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस फुगत चालली आहे. मृत्यूदरदेखील वेगाने वाढतो आहे. असे असले तरी काही महाभागांना राजकारणाशिवाय काही सूचत नाही. ऑक्सिजन संपत आलेला असताना मदतीसाठी आम्ही केंद्र सरकारातील कुणाला फोन करायचा असा आर्त प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन बैठकीत विचारला. सद्गदित कंठाने दिल्लीतील मृतांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. इथवर सारे ठीक होते. सार्‍याच मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील परिस्थितीची काळजी आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ती व्यक्त होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे, पण उच्चस्तरीय बैठकीतील घडामोडी समाजमाध्यमांवर प्रक्षेपित करण्याचा केजरीवाल यांनी पाडलेला प्रघात अतिशय घातक मानावा लागेल. पंतप्रधानांसोबत होणार्‍या बैठका या अतिउच्च पातळीवरीलच असतात. त्यातील तपशील सार्वजनिक होणे घटनेच्या विरुद्ध आहे. अशा बैठकींमधील तपशील धोरणात्मक निर्णयांना कारणीभूत ठरत असतो. तो सार्वजनिक होणे राष्ट्राच्या हिताचे नाही. शेजारपाजारील शत्रूराष्ट्रे आणि दहशतवादी संघटना यांच्या हातात आयतीच गोपनीय माहिती पडते. म्हणून असले उथळ प्रकार टाळायचे असतात. मुख्य म्हणजे याचसाठी सर्व मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. केजरीवाल यांनी उथळ व सवंग प्रसिद्धीसाठी गोपनीयतेचे कलमच उडवून लावले. हे वर्तन निषेधार्ह तर आहेच, पण याची गंभीर दखल घेतली जायला हवी. केजरीवाल यांचा इरादा ओळखून पंतप्रधानांनी तिथल्या तिथे त्यांना झापले. अशा प्रकारचे अनधिकृत प्रक्षेपण हे परंपरांचे उल्लंघन आहेच. यापुढे असले काही खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना सुनावले. रागरंग ओळखून केजरीवाल यांनी हात जोडून माफी मागितली. हा सारा प्रकार कोरोनाशी झुंजणार्‍या दिल्लीकरांनी आणि अन्य देशवासीयांनी लाइव्ह बघितला. याच बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजनची कमतरता आणि रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा याबद्दलची चिंता पंतप्रधानांच्या कानी घातली. हवाईमार्गे ऑक्सिजन आणणे शक्य नसले तरी ऑक्सिजनचे रिकामे टँकर विमानाने नेऊन तेच टँकर ऑक्सिजन भरून रेल्वेमार्गे परत आणता येतील, अशी कल्पना पंतप्रधानांनीच सुचवली. या बैठकीनंतर बर्‍याच गोष्टी मार्गी लागतील असे वाटते. केजरीवाल यांच्यासारख्या कायम मतपेटीवर डोळा ठेवून असणार्‍या नेत्यांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये विनाकारण अडथळे येतात. अशा प्रकारचे संधीसाधू राजकारण सर्वच पक्षांच्या नेत्यांनी टाळायला हवे आणि कोरोनाविरुद्धचा मुकाबला अधिक बळकट करावा एवढीच तूर्त अपेक्षा आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply