मध्य रेल्वेच्या जोरदार हालचाली
कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेने माथेरानमध्ये डिझेल लोको शेड उभारण्यासंबंधीचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने रेल्वे अधिकार्यांच्या पथकाने नुकतीच जागेची पाहणी केली. सुरक्षेचे कारण पुढे करीत मध्य रेल्वेने 11 जूनपासून नेरळ-माथेरान व 28 जुलैपासून अमन लॉज-माथेरान शटल सेवा बंद केली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करावी यासाठी माथेरानमधील सर्वपक्षीय नेत्यांनी नेरळ येथे रेल रोकोच्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन करू नये म्हणून एडीआरएम आशुतोष यादव यांच्यासह मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागाच्या अभियंत्यांच्या पथकांनी माथेरानला भेटी दिल्या. त्यानंतर माथेरानमध्ये डिझेल लोको शेड उभारण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने रेल्वेचे सहाय्यक मंडळ अभियंता वाय. पी. सिंग, सीनियर सेक्शन इंजीन रेलपथ नेरळ अभियंता मनीष सिंग, सेक्शन अभियंता सुशील सोनावणे, इन्स्पेक्टर ऑफ वर्क्स आर. एस. यादव, टॉली मॅन काथोड गायकर, दारा हरी घुगे, सोपान सानप, महेश ठोंबरे, नेरळ-माथेरान मार्गाचे मुकादम शरद सानप, दगडू आव्हाड यांच्या पथकाने जागेची पाहणी केली. माथेरानमधील बोरीच मैदान या ठिकाणी डिझेल लोको शेड उभारण्याचे निश्चित करण्यात आले असून, त्या जागेची पाहणी करून आखणी करण्यात आली आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी ही जागा महसूल खात्याची असून सिटी सर्व्हे 3, एमपी 93 हा प्लॉट आहे. त्याच्या बाजूची जागा घेऊन टॅक्सी वाहनतळाला धक्का न लावता लोको शेडचे काम करावे, असे सूचित केले आहे, तर माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी हे काम युद्धपातळीवर करून माथेरानकडे पर्यटक संख्या वाढण्याच्या दृष्टीने रेल्वेने विचार करावा, असे भेटीदरम्यान सांगितले. लोको शेडसाठी साडेसहा कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. ठेकेदाराकडून काम करून घेऊन 1 जानेवारीपासून मिनीट्रेन सुरू करण्याच्या उद्देशाने ‘मरे’ने काम सुरू केले आहे.