Breaking News

कोट्यवधींचा घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेवर उद्या भव्य मोर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांना व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देण्याचे काम शेकापचे नेते विवेक पाटील देत आहेत, मात्र पैसे दिले जात नाही, तर दुसरीकडे सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी येत्या गुरुवारी (दि. 13) सकाळी 10 वाजता कर्नाळा बँकेच्या पनवेल येथील मुख्य शाखेवर ठेवीदारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
कर्नाळा बँकेत 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस झाला असून, बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील मात्र टोलवाटोलवीची उत्तरे देत ठेवीदार, खातेदार व त्यांच्यावर अवलंंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांच्या आयुष्याशी खेळत आहे. विवेक पाटील यांच्या या धोरणामुळे आज अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकारामुळे ठेवीदार संकटात सापडले आहेत. त्यांना दिलासा व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
पनवेल भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, भाजी मार्केट, शनेश्वर मंदिर टपाल नाका असे मार्गक्रमण करून कर्नाळा नागरी सहकार बँकेवर हा मोर्चा धडकणार आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply