रोहे ः प्रतिनिधी
तालुक्यातील भातपिके तयार झाली असून, शेतकरी कापणीच्या तयारीत आहेत, मात्र दसर्यापासून रोज सायंकाळी रोहा तालुक्यात सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने काही ठिकाणचे भातपीक आडवे झाले आहे. परतीचा पाऊस असाच पडल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाईल या भीतीने रोहा तालुक्यातील शेतकरी धास्तावले आहेत. रोहा तालुक्यात भातशेती हे मुख्य पीक आहे. यावर्षी भात लागवड झाल्यानंतर चांगला पाऊस पडला. त्यामळे भातपीकही बहरले होते. तालुक्यातील भातपीक तयार झाले असतानाच रोहे तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काही भागातील भातपीक शेतात आडवे झाले आहे. हा पाऊस असाच पडत राहिल्यास भातशेतीचे नुकसान होऊ शकते, अशी भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.