कर्जत : बातमीदार
कर्जत विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांची पोसरी (ता. कर्जत) येथे भेट घेतली. या वेळी त्यांनी निवडणुकीत थोरवे यांना साथ देण्याचे वचन दिले. कर्जत तालुक्यातील दामत भडवळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच साजिद नझे तसेच जलील नझे यांच्यासह नदीम खान, हमीद अन्सारी, शनी मुल्ला, समीर डोळसे, गुफरान जळगावकर आणि कर्जत, नेरळ, दामत, कळंब, माथेरान, खोपोली, खालापूर, हाळ येथील मुस्लिम बांधव या वेळी उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील मुस्लिम समाजाला महेंद्र थोरवे यांनी कायम आधार दिला आहे. आमच्या अडीअडचणीच्या वेळी थोरवे हे राजकारण विसरून धावून येतात. त्यामुळे या निवडणुकीत आमचा मुस्लिम समाज थोरवे यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दामत भडवळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच साजिद नजे यांनी या वेळी दिली. मुस्लिम बांधवांना राजकारणाचा भाग म्हणून आपण कधीही जवळ केले नाही. त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न केले. त्याची जाणीव ठेवून मुस्लिम समाज निवडणुकीत देत असलेला पाठिंबा हा भरून पावणारा आहे, असे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी या वेळी स्पष्ट केले.