Breaking News

‘आगरदांडा-इंदापूर चौपदरीकरणातील प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला द्या’

प्रांताधिकार्‍यांपुढे जनसुनावणी; निवेदन सादर

मुरुड : प्रतिनिधी

नियोजित आगरदांडा-इंदापूर चौपदरीकरणासाठी प्रशासनाच्या वतीने प्रकल्पबाधित शेतकर्‍यांची मते जाणून घेण्यात आली. या वेळी योग्य मोबदला मिळावा, अशी रास्त मागणी प्रकल्पबाधितांच्या वतीने सरकारकडे करण्यात आली.

मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथे सुमारे दोन हजार 700 कोटी रुपये खर्च करून दिघी-आगरदांडा बंदर विकसित होत आहे. बाहेर देशातून येणारा माल विविध ठिकाणी पोहचवण्यासाठी आगरदांडा ते इंदापूर हा चौपदरी रस्ता माणगाव येथील राष्ट्रीय महामार्गास जोडला जाणार आहे.तसेच आगरदांडा येथून रोहा येथे रेल्वे रुळाला मार्ग जोडला जाणार आहे. आगरदांडा येथील विकसित झालेला प्रकल्प उरण येथील जवाहरलाल नेहरू ट्रस्ट पोर्ट लवकरच हस्तांतरित करण्यात येणार असून येथील विकासकामाला मोठी चालना मिळून तातडीने आगरदांडा ते इंदापूर हा चौपदरीकरण रस्ता तयार करण्यास सुरुवातसुद्धा झाली आहे. आगरदांडा येथील ग्रामस्थांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आगरदांडा पोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारापासून भलामोठा डोंगर खोदून बायपास मार्ग काढण्यात येणार आहे.

आगरदांडा ते इंदापूर रस्त्याला सुरुवात झाली आहे, परंतु मुरुड तालुक्यातील नांदले, ऊसडी, टोकेखार, सावली, मिठागर या गावांमधून हा चौपदरीकरण रस्ता जाणार असून येथील 90 शेतकर्‍यांच्या जागा या रस्त्यासाठी जाणार आहेत. यासाठी येथील शेतकर्‍यांनी या भागातील काम बंद केले असून प्रथम जमिनीचा मोबदला द्यावा, मगच कामास सुरुवात करावी, अशी मागणी केली आहे.

येथील रस्त्यासाठी जमिनी देणार्‍यांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ‘अ’ यासाठी टोल प्लाझा होणार असेल तर स्थानिकांना त्यामधून सूट मिळाली पाहिजे, अशा मागण्या येथील स्थानिक शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.काम बंद केल्याने  उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांची सावली येथील मारुती मंदिराच्या प्रांगणात शेतकरी व अधिकारीवर्गाशी एक सभा संपन्न झाली. या वेळी तहसीलदार परिक्षित पाटील, एमएमआरडीएचे

उपअभियंता सचिन निफाडे, तसेच रस्त्याचे काम घेतलेले ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  उपस्थित शेतकर्‍यांनी निवेदनातील मागण्या मंजूर कराव्यात, मगच कामास सुरुवात करावी. आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या वेळी शेतकर्‍यांनी दिला आहे. या वेळी बाधित शेतकरी प्रदीप बागडे, नथुराम माळी व नथुराम पाटील यांनी  शेतकर्‍यांची बाजू मांडली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply