Breaking News

बंदला रायगडात अल्प प्रतिसाद

जनजीवन सुरळीत

अलिबाग ः प्रतिनिधी
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खैरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यात सोमवारी (दि. 11) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रायगड जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली, मात्र त्याला न जुमानता अनेक ठिकाणी बाजारपेठा नियमितपणे सुरू होत्या.
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने हा बंद पुकारला होता. शेकापनेही या बंदला पाठिंबा दिला होता. तरीदेखील जिल्ह्यात बंद पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, महाड, मुरूड, कर्जत, खोपोली आदी ठिकाणच्या व्यापार्‍यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. याशिवाय एसटी तसेच इतर वाहतूकही सुरू होती. एकंदर सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. त्यामुळे बंदला जिल्ह्यात म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहिल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये सकाळपासून किराणा दुकाने, हॉटेल्स, भाजीपाला, दूध, फळे, औषधांची दुकाने सुरू होती. प्रवासी साधनांमध्ये एसटीसह रिक्षा, मिनीडोअर, जलवाहतूक सेवा सुरळीत सुरू होती. यामुळे सामान्य नागरिकांची कुठलीही गैरसोय झाली नव्हती. सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे पहायला मिळाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, म्हसळ्यात बंद पाळला गेला असला तरी तेथे राष्ट्रवादीकडून शिवसेना, शेकाप, काँग्रेस या तीन पक्षांना वगळून स्वतंत्रपणे तहसीलदारांना पत्र देण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी पहावयास मिळाली.

मविआची जबरदस्ती; व्यापार्‍यांमध्ये नाराजी
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी व नेते सकाळपासूनच दुकाने बंद करण्यासाठी रस्त्यावर फिरत होते. त्यांनी व्यापारी, दुकानदारांना आपले व्यवसाय बंद करावे यासाठी जबरदस्ती केली. त्यामुळे काही ठिकाणी नाईलाजास्तव दुकाने बंद करावी लागली. कोरोनाच्या तडाख्यानंतर आता कुठे बाजार सुरळीतपणे सुरू व्हायला सुुरुवात झाली तोच बंदसाठी बळजबरी करण्यात आल्याने या वेळी व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.

महाविकास आघाडी सरकार लखीमपूरच्या घटनेचे राजकारण करून महाराष्ट्र बंदचा हास्यास्पद प्रयत्न करीत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने आजपर्यंत का बंद पुकारला नाही, याचा मी निषेध व्यक्त करते.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल महानगरपालिका

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply