Breaking News

लावणीप्रधान चित्रपटाची परंपरा… लावणीसम्राट विठाबाई नारायणगावकरांवर चरित्रपट ‘ईठा’

मराठी चित्रपटाच्या चौफेर, यशस्वी, बहुरंगी बहुढंगी वाटचालीतील अभिनेत्रीची ठळक वैशिष्ट्यातील एक महत्त्वाची गोष्ट, त्यांची नृत्य निपुणता.विशेषत लावणी नृत्य. यात हंसा वाडकर, जयश्री गडकर तसेच लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक अशी बरीच नावे घेता येतील.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आता लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘ईठा’ हा चरित्रपट दिग्दर्शित करीत आहे आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरला निवडले आहे. श्रद्धाची आतापर्यंतची वाटचाल पाहता ती नृत्यासाठी ओळखली जात नाही. ढोलकीच्या तालावरचे लावणी नृत्य तर फारच दूर. शक्ती कपूरची मुलगी ही तिची पहिली ओळख, पण आपल्या मेहनतीने तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिची आई शिवांगी कोल्हापुरे ही महाराष्ट्रीयन. मावशी पद्मिनी कोल्ह्यपुरे. श्रद्धला मराठी बोलता येते हे तिच्या भेटीचा सुखद योग आला असता समजले. उच्चार अतिशय शुद्ध आहेत.
श्रद्धा अतिशय मेहनतीने, कसून सराव करून, दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक यांच्या सुचनांचे पालन करीत विठाबाई नारायणगावकर नक्कीच उत्तम साकारेल. एकदा चित्रपट स्वीकारला की पूण व्यावसायिकपणे आपले काम करणे हे आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीचे वैशिष्ट्य.
माधुरी दीक्षित ‘ईठा’ या भूमिकेसाठी एकदम परफेक्ट निवड होईल ना? चित्रपटसृष्टीतीत ती चाळीस वर्षे कार्यरत आहे. लगेचच तिच्या वयाचा मुद्दा अथवा गुद्दा नकोच. आजही ती फिट्ट आहे,
तिच्या चेहर्‍यावरचे हास्य कायम आहे. तिची लोकप्रियता कायम आहे. सोशल मीडियात तिचे कोटीत चाहते आहेत. आजही ती नृत्यात पारंगत आहे हे एका जाहिरातीत दिसते, पण आपण म्हणतोय म्हणून एखाद्या सेलिब्रेटीजची निवड करण्यात येत नसते. बरीच व्यावसायिक गणिते असतात. कधी अटी आणि शर्ती असतात. सगळेच जुळून यायला हवे.
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नृत्य निपुण अभिनेत्री आहेत. त्यांचा विचार का झाला नाही असा एक प्रश्न असतोच, पण चित्रपट हिंदीत आहे. जगभरातील किमान ऐंशी देशात तो प्रदर्शित होणार आहे. तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीला तारका जास्त महत्त्वाची ठरते (सोशल मीडियात काही मिनिटांच्या रिलमध्ये धन्यता मानणे योग्य नाही हे यातून लक्षात घ्यावे).
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम नृत्य तारका म्हणून बरीच नावे घेता येतील. पूजा सावंत, अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी, उर्मिला कानेटकर, सोनाली कुलकर्णी, श्रृती मराठे, सायली संजीव, संस्कृती सालगुडे, पल्लवी पाटील ही नावे आवर्जून घ्यायला हवीत.
याच निमित्ताने मराठी चित्रपटातील लावणीच्या प्रवासातील काही गोष्टी सांगायलाच हव्यात. साधारण सतरा अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट. ग्रामीण भागातील लाऊडस्पीकरवर, शहरातील रेडिओ एफएमवर, टेपरेकॉर्डरवर, शहरापासून तालुक्याच्या ठिकाणावरील इव्हेन्टसमध्ये, वाढदिवसाच्या पार्टीत मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, अप्सरा आली… कोमल काया की मोहमाया पूनवचांदनं न्याली… ही लावणी नृत्य गीते सगळीकडेच ऐकायला येऊ लागली आणि त्याच लोकप्रिय गाण्यांच्या वातावरणात रवि जाधव दिग्दर्शित ‘नटरंग’ (2009) प्रदर्शित झाला तोच फर्स्ट शोपासूनच सुपर हिट.
पिक्चरची गाणी लोकप्रिय असतील तर जनसामान्यांपर्यंत तो चित्रपट सहज पोहचतो. या दोन गाण्यांनी अमृता खानविलकर व सोनाली कुलकर्णी स्टार झाल्या आणि या यशाची गोड गोड फळे त्याना आजही मिळताहेत. गीतकार गुरू ठाकूर आणि संगीतकार अजय अतुल मुख्य प्रवाहातील म्हणून ओळखले गेले ते अगदी कायमचेच. ही दोन्ही फक्कडबाज लावणी गीते.
चित्रपती व्ही.शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ (1972)मधील लावणी गीतांनी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. आजही ‘पिंजरा’तील गाणी अफाट लोकप्रिय आहेत. माधुरी दीक्षितदेखील मराठीतील आपले आवडते गाणे म्हणून दिसला गं दिसला हे सांगते. यात बरेच काही आले.
लावणीप्रधान चित्रपट म्हटल्यावर चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित राजकमल कलामंदिर निर्मित पिंजरा हा चित्रपट महत्वाचा ठरतो. या चित्रपटातील सात लावणी गीते उषा मंगेशकर यांनी गायलीत आणि संध्या यांनी आपल्या बहारदार नृत्य कौशल्याने त्या रूपेरी पडद्यावर साकारल्यात. कोल्हापुरात शालिनी सिनेटोन स्टुडिओत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. या चित्रपटासाठी लावणीगीते गाण्याच्या संधीचा उषा मंगेशकर यांना विशेष आनंद झाला. अण्णांनी अर्थात व्ही शांताराम यांनी आपल्याला गायला बोलावणं हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट होती. आपल्या कारकीर्दीत ’पिंजरा’ सिनेमातील गीतांचं स्थान फार मोलाचं आहे असं उषा मंगेशकर यांचं प्रामाणिक मत आहे.
’पिंजरा’तील ’लागली कुणाची उचकी’ हे गीत गाण्यासाठी अधिक आव्हानात्मक आहे, ते गाताना आपला कस लागला, असं उषा मंगेशकर यांचं म्हणणं आहे.
जुन्या काळात विशेषत: पन्नास साठ सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटांचे ‘बजेट’ खूप कमी असल्यामुळे निर्माते संगीतावर हात राखून खर्च करीत. त्यामुळे भालजींची निर्मिती असणार्‍या चित्रपटांच्या ध्वनिमुद्रणासाठी लतादिदींनी फक्त चारपाच वादक कलावंतांचे साह्य घेतले, परंतु या कलाकारांमध्ये पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, अण्णा जोशी यांचा समावेश होता. दीदीने संगीत दिलेल्या गीताचे वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण व्हायचे. आश्चर्य म्हणजे अवघ्या दोन ते अडीच तासांत दिदी एक गाणे ध्वनिमुद्रित करीत असत. गायनक्षेत्रात दिदी सर्वोच्च स्थानी पोचल्यानंतरही त्यांच्यावर संगीत देताना कसलेही दडपण नसे. त्या काळात भालजींसारखे दिग्दर्शक दिदींना दूरध्वनीवरून केवळ कथानक सांगत आणि दिदी केवळ कथानक ऐकून इथेच गीताचे ध्वनिमुद्रण करीत असे. भालजींचा दिदींवर मोठा विश्वास असल्याने त्यांना ध्वनिमुद्रित गीतेच ऐकविली जात. प्रतिभावंत लेखक क्षणार्धात चांगली ओळ लिहून जातो. दिदींचेही तसेच होते. दिदींची प्रत्येक चाल हृदयातून येत असे. चाल सुचल्यावर ती रसिकांना आवडेल की नाही याचा विचार त्या करीत नसत.
‘आनंदघन’ नावाने लता मंगेशकरच संगीत देत असल्याची खात्री पटल्यावर मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक निर्मात्यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी संगीत देण्याचा आग्रह केला, परंतु दिदींनी केवळ भालजींच्या आग्रहाखातर संगीत दिले असल्याने त्यांचा इतरांना नकार ठरलेलाच होता. सख्खी बहीण उषा मंगेशकरलाही दिदींनी नकार दिला. ‘पवनाकाठचा धोंडी’ या आपण निर्मिलेल्या चित्रपटासाठी दिदीने संगीत द्यावे, अशी उषा मंगेशकर यांची अपेक्षा होती, मात्र दिदी त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत. हृदयनाथ मंगेशकर यांनीही दिदींना संगीत देण्याचा आग्रह केला होता, परंतु दिदी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या.
साठच्या दशकात मोठ्याच प्रमाणावर शाहीरपट आणि तमाशाप्रधान मराठी चित्रपट पडद्यावर आल्याचे दिसते आणि त्यासह अनेक लावणी गीतेही आली. 1958चा लोकशाहीर अनंत फंदी ते 1972चा ‘पिंजरा’ या कालावधीतील असे चित्रपट सांगायचे तर, सांगत्ये ऐका, चाळ माझ्या पायात, शाहीर परशुराम, रंगल्या रात्री अशा, सुंदरा मनामध्ये भरली, सवाल माझा ऐका, मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, ही नार रूपसुंदरी, सुरंगा म्हंत्यात मला, सांगू कशी मी, देवा तुझी देवाची जेजुरी, मानाचा मुजरा, मुरळी मल्हारी रायाची, रंगू बाजाराला जाते, गण गौळण, डोंगरची मैना, मला तुमची म्हणा, गणानं घुंगरु हरवलं, लाखात अशी देखणी, पिंजरा… त्या काळात वर्षभरात पंधरा सोळा मराठी चित्रपट निर्माण होत त्या तुलनेत ही संख्या उत्तमच म्हणायची.
रणजीत देसाई यांच्या, तबलजींच्या जीवनावरील कथेवर हरिभाऊ रहातेकरांनी सहकारी तत्त्वावर रंगल्या रात्री अशा या चित्रपटाची निर्मिती 1962मध्ये केली. कोल्हापूरचे अरुण सरनाईक त्या चित्रपटाचा नायक होते. त्या चित्रपटात लावण्या, गझला व नाट्यगीते असे संगीताचे वेगवेगळे प्रकार होते. लावणीत संगीतकार वसंत पवार फॉर्मात होते. ’रंगल्या रात्री अशा’मध्ये त्यांनी गीतकार जगदीश खेबूडकर यांना प्रथम संधी देऊन त्यांच्याकडून लावण्या लिहून घेतल्या आणि त्या लावण्यांचे चित्रिकरण राधाबाई बुधगावकर यांच्या तमाशा बारीवर केले. खेबुडकरांनी लिहिलेल्या पहिल्याच लावणीचा मुखडा होता ’नाव गाव कशाला पुसता? अहो, मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणतात लवंगी मिरची’. कोल्हापूरच्या गीतकार व नायकाप्रमाणेच लावणी गायिकाही कोल्हापूरची असावी असा विचार करून वसंतरावांनी ती लावणी सुलोचना चव्हाण यांच्याकडून गाऊन घ्यायची असे ठरवले. वसंतराव सुलोचनाबाईंना त्यांच्या घरी मुंबईला जाऊन भेटले. त्या भेटीचे वर्णन सुलोचनाबाईंच्या शब्दांत….
…मी घरात होते. अचानक दार वाजले, मी दार उघडले, बघते तर बाहेर गबाळ्या कपड्यातील, केस विस्कटलेले एक गृहस्थ उभे! मी म्हणाले, ’आपण कोण?’ ते म्हणाले, ’मी वसंत पवार, सुलोचनाबाई तुम्हीच ना? तुमच्याकडून लावणी गाऊन घ्यायची आहे.’ मी थक्कच झाले. साक्षात वसंत पवार, मराठीतील एवढे मोठे नामवंत संगीतकार, माझ्या दारात उभे! त्यांनी खिशातून कागद काढला. त्यांनी घडी घातल्यामुळे पार चुरगाळल्या गेलेल्या त्या कागदावरची लावणी वाचून दाखवली. दुपारच्या भोजनाची वेळ झालेली होती. मी त्यांना ’जेवणार का?’ म्हणून विचारले. वसंतरावांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते सद्गदित आवाजात म्हणाले, ‘लोकांनी आजपर्यंत मला फक्त पिणार का? म्हणून विचारले. तुम्ही प्रेमाने दोन घास खाणार का? असे कुणीच विचारले नाही.
‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपट मुंबईत गिरगावातील मजेस्टिकमध्ये लागला होता. तबलावादक अल्लारखॉ, नर्तिका मिनू मुमताज, गायक छोटा गंधर्व, पार्श्वगायिका आशा भोसले व सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या कलाकौशल्याने बोलपटात अक्षरश: नवरंग उधळले होते. पडद्यावर राधाबाई बुधकरांच्या संगीत बारीचे चित्रण बघताना प्रेक्षक अस्सल तमाशाचा अनुभव घेऊन धुंद होत. गायन-वादन, ताल-सूर, गळा-हात यांचा इतका सुरेख मिलाफ ‘रंगल्या रात्री अशा’पूर्वी क्वचित झाला असेल..
कथा-पटकथा लेखक रणजीत देसाई, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार वसंत पवार व पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण हा यशस्वी फॉर्म्युला अनंत माने यांच्या ’सवाल माझा ऐका’ या चित्रपटातही होता. त्या चित्रपटाद्वारे माया जाधव यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यातील सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या, कसं काय पाटील बरं हाय कां?’ व ’सोळावं वरीस धोक्याचं गं’ या दोन लावण्यांनी कहर केला. महाराष्ट्रभर त्या लावण्या गाजल्या. या चित्रपटाचा रौप्य महोत्सव आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली टॉकिजमध्ये 10 एप्रिल 1965 रोजी थाटामाटात साजरा झाला.
पुण्याच्या राम कर्वे व राम देवताळे यांच्या ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद व दिग्दर्शन दिनकर द. पाटील यांचे होते तर गाणी ग.दि. माडगुळकरांनी लिहिलेली होती. वसंतरावांनी दोन तासांत त्यातील सर्व गाण्यांना चाली लावल्या. ढोलकीची साथ बबन काळे यांनी केली होती. त्यातील सुलोचनाबाईनी गायलेल्या,
’पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नव शालू नवा’ आणि ’फड सांभाळ तुज्याला गं आला, तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा’ या दोन लावण्यांचे ध्वनिमुद्रण राजकमल स्टुडिओत चालू होते. लावण्या इतक्या सुरेख रंगल्या होत्या, की त्या ऐकायला ध्वनिमुद्रक मंगेश देसाई स्वत: जाऊन शांतारामबापूंना घेऊन आले. त्या चित्रपटाच्या गाण्यांच्या पार्श्वगायनासाठी 1965 साली सुलोचना चव्हाण माईंना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठी चित्रपटातील लावणी गीत संगीत व नृत्य यांच्या यशस्वी परंपरेचा वेध घ्यायचा तर त्यात बरेच रंगढंग आहेत…अनेक आठवणी, किस्से, गोष्टी, कथा आहेत… लावणी गीतांनी अनेक गोष्टी घडवल्या.
अशीच ही एक. ’ही माझी लक्ष्मी’ (1951) या चित्रपटाद्वारे सुलोचना कदम हिंदीतून मराठीत आल्या. त्याचे संगीतकार होते वसंत देसाई. सुलोचनामाई यांनी त्या चित्रपटासाठी गायलेली लई दिसांनी आला ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली. माईनी 1955च्या ’कलगीतुरा’ या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गाय लिहीलेल्या तुरेवाले किती पळाले वगैरे लावण्या गायल्या. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ’शामराव चव्हाण’. पुढे त्याच दिग्दर्शकाबरोबर माईंचे लग्न झाले आणि त्या सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. शामराव चव्हाण यांनी सुलोचनाबाईंना शब्दोच्चारांचे तसेच कुठल्या शब्दावर जोर द्यायचे त्याचे शिक्षण दिले. माईंच्या लावणीला त्याचा मोठा फायदा झाला आणि सुलोचनामाई चव्हाण या लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखल्या गेल्या.
साठच्या दशकात मोठ्याच प्रमाणावर शाहीरपट आणि तमाशाप्रधान मराठी चित्रपट पडद्यावर आल्याचे दिसते आणि त्यासह अनेक लावणी गीतेही आली. 1958चा लोकशाहीर अनंत फंदी ते 1972चा पिंजरा या कालावधीतील असे चित्रपट सांगायचे तर, सांगत्ये ऐका, चाळ माझ्या पायात, शाहीर परशुराम, रंगल्या रात्री अशा, सुंदरा मनामध्ये भरली, सवाल माझा ऐका, मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, ही नार रूपसुंदरी, सुरंगा म्हंत्यात मला, सांगू कशी मी, देवा तुझी देवाची जेजुरी, मानाचा मुजरा, मुरळी मल्हारी रायाची, रंगू बाजाराला जाते, गण गौळण, डोंगरची मैना, मला तुमची म्हणा, गणानं घुंगरु हरवलं, लाखात अशी देखणी, पिंजरा….त्या काळात वर्षभरात पंधरा सोळा मराठी चित्रपट निर्माण होत त्या तुलनेत ही संख्या उत्तमच म्हणायची.
रणजीत देसाई यांच्या, तबलजींच्या जीवनावरील कथेवर हरिभाऊ रहातेकरांनी सहकारी तत्त्वावर ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची निर्मिती 1962मध्ये केली. कोल्हापूरचे अरुण सरनाईक त्या चित्रपटाचा नायक होते. त्या चित्रपटात लावण्या, गझला व नाट्यगीते असे संगीताचे वेगवेगळे प्रकार होते.
लावणीप्रधान चित्रपटांची ही परंपरा आता चंद्रमुखी (अमृता खानविलकरची फक्कडबाज लावणी नृत्य), फुलवंती (प्राजक्ता माळीची तजेलदार नृत्य) अशी आजही यशस्वीपणे सुरू आहे.
लावणी गीत संगीत व नृत्य ही मराठी चित्रपटाची एक विशेष खासियत आहे, ओळख आहे. नृत्य हा अभिनयातील एक अतिशय मेहनती आणि सर्व प्रकारच्या भावभावना असणारा लोकगीत लोकसंगीत यांची यशस्वी परंपरा असलेला प्रकार. अतिशय आदर ठेवावा असाच कला प्रकार.
ही परंपरा आता लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित विठाबाई नारायणगावकर, या घोषणेपासूनच चर्चेत असलेल्या चरित्रपटापर्यत आला आहे. हा चित्रपट हिंदीत असल्याने तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचेल हे निश्चित. आपण श्रद्धा कपूरला शुभेच्छा देऊयात…

  • दिलीप ठाकूर, चित्रपट समिक्षक

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply