खोपोली शहरप्रमुख सुनील पाटील यांचा दावा
खोपोली : प्रतिनिधी
केंद्र व राज्यातील भाजप, सेना महायुती सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्याने विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा शिवसेनेचे खोपोली शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी केला आहे. खोपोली शहरात सध्या शहरप्रमुख सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागांत महायुतीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे राज्यात महायुतीची लाट कायम असून, केंद्रात व राज्यात महायुती सरकारने जनकल्याणकारी निर्णय घेतले असून, सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळत आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे सरकारच्या अनुदानाचा थेट लाभार्थ्यांना फायदा होत असून, त्यातीला भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. गेल्या पाच वर्षांत विकासाची गंगा तळागाळाच्या जनतेपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जनतेने यावेळेसही महायुतीलाच विजयी करण्याचे ठरविले आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे प्रचाराला जातात तेव्हा यावेळेस बदल होणार व महायुती विजयी होणार, अशा प्रतिक्रिया ऐकावयास मिळत असल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले. शिवसैनिकांप्रमाणेच भाजप कार्यकर्ते कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात प्रामाणिकपणे थोरवे यांचा प्रचार करीत असल्याने येथील निकाल महायुतीच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा सुनील पाटील यांनी केला आहे. सध्या महायुतीचा प्रचार खोपोली शहरातील विविध प्रभागात सुरू असून, त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे खोपोली शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी हेदेखील उपस्थित होते.