स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण होत असली तरी आजही दुर्गम भागातील अनेक गावे, वाड्या विशेषत: धनगरवाड्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. यामध्ये कोकणातील धनगरवाड्या तर दुर्गम भागात वसल्याने आजही रस्ते, पाणी अशा मूलभूत योजना या धनगरवाड्यांवर पोहचल्या नाहीत. विकासाचा दृष्टिकोन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच या वाड्यांचा विकास करू शकतात. त्यांनी आवर्जून कोकणातल्या या दुर्लक्षित आणि उपेक्षित धनगरवाड्यांकडे लक्ष द्यावे.
महाराष्ट्रात विशेषतः कोकणात असलेल्या धनगरवाड्या या मूळ गावापासून दूरच वसलेल्या आहेत. बहुतांश धनगरवाड्या डोंगरावर, तर अनेक धनगरवाड्या या जंगल भागात वसलेल्या आहेत. या धनगरवाड्यांच्या आजही मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. जोपर्यंत या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत या धनगरवाड्यांचा विकास होणार नाही. रायगड जिल्ह्यातील बहुतांश गावे ही दुर्गम आहेत. मूळ गावात विकासाची कामे झाली असली तरी या गावांच्या शेजारी असलेल्या धनगरवाड्या गावकुसापासून दूर आणि एकत्र वसलेल्या नसल्या कारणाने विकासापासून वंचित आहेत. आधीच गावाबाहेर त्यात डोंगराच्या वर कडेकपारीत या धनगरवाड्या वसलेल्या आहेत. पिढ्यान्पिढ्या हे लोक या ठिकाणी राहत आहेत. त्यांच्या वाडीला जायला रस्ता नाही. पिण्यास पाण्याच्या योजना नाहीत. विकासाचे कोणतेच काम नाही तरीदेखील आला दिवस सारखा म्हणत हे लोक गावातील लोकांच्या विकासाला चालना देत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजना गावात झाल्या, मात्र डोंगरावर योजना न्यायची कशी, या नकारार्थी प्रश्नानेच या वाड्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्या आहेत. धनगरवाडीच्या शेजारीच असलेल्या पाण्याच्या स्त्रोताला एक डबके करून त्या डबक्यातील पाणी जनावरांप्रमाणे पिण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विकासाची व्याख्याच त्यांना अवगत नसल्याने तेदेखील याचा फारसा विचार करीत नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्षे झाली तरी या धनगरवाड्या आजही उपेक्षित असल्याने आजपर्यंतच्या सरकारने नक्की काय केले, हा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात गावांच्या मूलभूत सुविधा आणि गावे स्वयंपूर्ण करण्याकडे वेगाने वाटचाल होत आहे. प्रत्येक घरात वीज, गॅस आणि नळाचे पाणी देण्याच्या सरकारच्या आराखड्यात या धनगरवाड्यांचाही समावेश व्हायला हवा.
रायगड जिल्ह्यातील अनेक धनगरवाड्यांवर पायपीट करत तेथील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही पत्रकारांनी केला. महाड तालुक्यातील काही धनगरवाड्या दोन जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या सीमारेषांवर वसल्या आहेत. एक घर पुणे, दुसरे रायगड, तर तिसरे रत्नागिरी जिल्ह्यात असल्यामुळे प्रशासनही गोंधळात पडते कोणत्या विभागाने काम करावे ते. रायगड जिल्ह्यात कोणती धनगरवाडी कोठे आहे याचे पक्के ज्ञानही प्रशासनाला नाही. वाडीवरच्या व्यक्तीचा परिचय, तेथील समस्या आणि विकासासाठी काय करता येईल याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेणे गरजेचे आहे. काही सामाजिक संस्थांनी या धनगरवाड्यांकडे लक्ष दिले आहे. गावात पाणी योजना, जिल्हा परिषदांना जमणार नाही अशा देखण्या शाळा इमारती बांधून दिल्या आहेत.
महाड तालुक्यातील विकासापासून वंचित धनगरवाड्यांमध्ये चिंभावे, वाघोली, गाढव खडक, नेवाळी, चाचखोंडा, वळई आदी धनगरवाड्यांचा समावेश होता. या धनगरवाड्यांच्या समस्यांबाबत पत्रकारितेच्या माध्यमातून दै. ‘राम प्रहर’मधून व्यथा मांडण्याचे काम केले.
आजही धनगरवाड्यांपर्यंत विकास पोहचला नाही. रायगड जिल्ह्यातील अनेक धनगरवाड्या जशा गावापासून कोसो दूर आहेत, त्याचप्रमाणे त्या विकासापासूनदेखील कोसो दूर राहिल्या आहेत. गेली अनेक वर्षे आपण या वाड्यांच्या विकासाकरिता काम केले. त्यांना विविध योजना दिल्या, पण यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे धनगरवाड्यांच्या विकासाकरिता, त्यांच्या प्रगतीकरिता शिक्षण महत्त्वाचे आहे, मात्र शाळा, महाविद्यालये या वाड्यांपासून दूर आहेत. शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना चार ते पाच किमीची पायपीट करावी लागते. त्या वेळी क्वचितच काही विद्यार्थी
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत. या वाड्यांवर शैक्षणिक प्रबोधनाची गरज आहे. काही धनगरवाड्यांवर महिलादेखील सरपंच झाल्या आहेत. यामुळे गावातील योजना धनगरवाड्यांवर पोहचण्यास मदत होत आहे. माणगाव तालुक्यातील पयली धनगरवाडी ही 2000 फूट उंचावर आहे. या धनगरवाडीतील बाया झोरे ही महिला सरपंच झाली आहे. आमडोशी गावातदेखील धनगर समाजाची व्यक्ती सरपंच झाली आहे. या जन आणि शैक्षणिक प्रबोधनामुळे बराचसा फरक जाणवू लागल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी गावाची भौगोलिक रचना आणि वाडीवरील अज्ञानामुळे शासकीय योजना राबवताना दुजाभाव होतच राहतो. गावातील योजना धनगरवाडीवर कधी पोहचल्याच नाहीत. माणगाव परिसरातील तवली धनगरवाडीच्या महिला आजही पाणी भरण्याकरिता वयलीमध्ये येतात.
महाड तालुक्यातील चाचखोंडा गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवली, तर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. धनगरवाड्यांचे हे चित्र बदलण्याकरिता शासकीय योजना व्यवस्थित राबवल्या गेल्या पाहिजेत. केवळ कागदी घोडे रंगवल्यानेच धनगरवाड्यांची अशी अवस्था कोकणात पाहावयास मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेव आशेचा किरण आहेत. त्यांचे कल्पक बुद्धिकौशल्य आणि विकासाचा अजेंडा धनगरवाड्यांचे हे ग्रहण मिटवू शकतो.
-महेश शिंदे, खबरबात