जी भाषा काँग्रेसचे नेते बोलत, त्याच्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये मोठ्या बातम्या होत होत्या. विरोधासाठी विरोध करताना कुठल्या थराला जायचे त्याचे भान काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना उरलेले नाही.
विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये प्रचाराच्या धुमश्चक्रीचा धुरळा आता शिगेला पोहोचला आहे. कालचा रविवार हा प्रचाराच्या रणधुमाळीतला शेवटचा सुटीचा दिवस होता. साहजिकच सर्वच पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी आपापली सैन्ये रणांगणात उतरवली होती. अर्थात, सर्व विरोधकांनी उसने अवसान आणून ताकद पणाला लावलेली दिसत असूनही निवडणुकीचे पारडे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीकडेच झुकलेले स्पष्ट दिसते आहे. हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. पाच वर्षांच्या सत्तेनंतर जनतेला सामोरे जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला अजिबातच अँँटी इन्कम्बन्सीला (सरकारविरोधी वातावरण) तोंड द्यावे लागत नसल्याचे पाहून विरोधकांच्या तोंडचे पाणी आधीच पळाले आहे. या परिस्थितीची सारीच कारणे उघड आहेत. देवेंद्र फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुकीला सामोरे जात आहे तर विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नाही. किंबहुना, आपले पडके घर सावरण्यातच त्यांची अवघी शक्ती आटताना दिसते आहे. प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगताना याच विरोधकांनी केलेला सत्तेचा गैरवापर अद्यापही जनतेच्या विस्मरणात गेलेला नाही. त्यामुळे जनता पर्याय म्हणून त्यांचा विचारच करीत नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आम्ही तेल लावून मैदानात उतरलो आहोत पण समोर पैलवानच नाही, असे एका भाषणात काढलेले उद्गार ज्यांना बोचायचे त्यांना बोचले आहेत. विरोधक निवडणुकीत एकच टीका वारंवार करताना दिसतात की, 370 कलम, तिहेरी तलाक आदींचा विधानसभा निवडणुकाशी संबंध काय? 370 कलम हटवण्याच्या देदिप्यमान कामगिरीचे श्रेय भाजपने घेतलेले विरोधकांना रुचत नाही. परंतु भाजपला या कामगिरीचा सार्थ अभिमान वाटतो. याच विरोधकांनी काश्मीर प्रश्नी जी भूमिका घेतली होती, ती आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानसारखीच होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार रविवारच्या प्रचारसभेत घेतला. 370 कलमाबद्दल हे मगरीचे अश्रू ढाळणे बंद करा, हिंमत असेल तर हे कलम पुन्हा आणण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करून दाखवा असे खुले आव्हान मोदीजींनी विरोधकांना दिले. मोदीजींच्या या घायाळ करणार्या वारामुळे विरोधक गलितगात्र झालेले दिसत असून विरोधी आघाड्यांवर अक्षरश: सामसूम झाली आहे. ज्या कारणांमुळे जनतेने भाजप-सेनेचे सरकार आणले तो आपला हेतू सफल झाल्याचे जनतेला स्पष्ट दिसत आहे. अशा परिस्थितीत सरकारविरोधी असंतोष निर्माण होणार तरी कसा? सत्ता आवाक्यातून दूर निघून गेल्यानंतर निदान विरोधी पक्षाची जागा तरी मिळावी अशी मनधरणी करण्याची वेळ काही विरोधी पक्षांवर आली आहे. केंद्रात मोदी सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार याला पर्याय नाही हीच बाब ठळकपणे समोर येते. प्रचारात कुणीही कितीही चिखलफेक केली, कितीही खालची पातळी गाठली तरी महाराष्ट्राचे भविष्य बदलणार नाही. कारण जनतेने आपले मत एव्हाना निश्चित केले आहे.