पनवेल : बातमीदार
भावना फोर्ड कंपनीच्या मालकीच्या ग्राहकांकडून कार सर्व्हीसिंग केलेली व इतर जॉब कार्डची 13 लाख 62 हजार रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये न भरता कंपनीचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळस्पे गावात असलेल्या भावना फोर्ड शाखेमध्ये गौरव अशोक सिंग हा कॅशिअर म्हणून 1 जुले 2017 पासून काम करीत असून तो प्रत्येक दिवशी कोणत्याही प्रकारे जमा झालेली कॅशसंबंधी आलेले जॉब कार्डची बिले पूर्ण बंद करुन आलेली एकूण बिलाची रक्कम बँकेमध्ये जाऊन कंपनीच्या नावे भरण्याचे काम करीत आहे. मॅनेजर म्हणून काम करीत असलेल्या राजेश भालचंद्र माने (वय 52) यांनी शाखेच्या सर्व फाईल्सची पडताळणी केली असता या कंपनीमध्ये बर्याच क्रमांकाच्या जॉब कार्डची बिले ही कंपनीच्या खात्यामध्ये जमा झाली नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे याबाबत त्यांनी गौरव सिंग याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन संगणक कार्यप्रणालीमध्ये त्रुटी येत असल्याचे सांगितले. तसेच काही ग्राहकांनी सर्व्हीसिंग केल्याचे पैसे जमा केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे या फाईल्स बंद करण्यात आल्या नसल्याचे माने यांना सांगितले. त्यानंतर या फाईल नंबरवरुन ग्राहकांकडे माने यांनी खात्री केली असता त्यांनी त्यांच्याकडे असलेली बिले पेड केली असल्याचे सांगितले.
या प्रकारची माहिती माने यांनी जनरल मॅनेजर चिराग प्रवीण जोगनी यांना दिली. त्यानंतर कंपनीतील 10 ऑगस्ट 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंतच्या पावतीच्या दरम्यान 14 लाख 68 हजार 981 एवढ्या रकमेच्या बिलांच्या अनुषंगाने गौरव सिंग यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्या रकमेपैकी एक लाख नऊ हजार एवढी रक्कम कंपनीकडे जमा केली व उर्वरीत राहिलेली 13 लाख 62 हजार रक्कम खर्च झाल्याचे सांगितले. उर्वरित रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये भरण्यास नकार दिला. त्यामुळे माने आणि जोगनी यांनी गौरव अशोक सिंग याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला पोलीस कोठडी
गाड्या भाड्याने लावून महिन्याला पैसे देतो असे सांगून नागरिकांची फसवणूक करणार्या आरोपीला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 21 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने त्याला 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तळोजा येथे गाड्या भाड्याने लावतो असे सांगून मालकांकडून गाड्या ताब्यात घेऊन त्यांचे भाडेदेखील न देणार्या मनोज काळूराम पाटील (वय 42) आरोपीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याउलट गाडीचा मालक भाडे मागायला गेल्यावर आरोपी त्यांना बंदुकीच्या सहाय्याने धमकावत असे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 21 मालकांच्या 21 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच त्याच्यावर हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून हत्यार देखील जप्त करण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी तीन गाड्या जप्त करणे बाकी असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बिराप्पा लातुरे यांनी दिली.
दीड किलो गांजासह एकाला अटक
नवी मुंबई येथील अमली विरोधी पथकाला खारघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये ओवा गाव येथे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाचा गांजा या अमली पदार्थांची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. शाम गोविंद कसबे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचा दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.