अलिबाग : प्रतिनिधी
ऑक्टोबर हीटमुळे उन्हाचा पारा चढला आहे, पण उन्हाची पर्वा न करता उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात चढत्या पार्याबरोबरच राजकीय वातावरणही सध्या तापले आहे.
ऑक्टोबर महिना मध्यावर आला असताना उन्हाची तीव्रता वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील इतर विभागांपेक्षा अलिबागमध्ये तापमान कमी असते. असे असताना चुंबकीय वेधशाळेत अलिबागचे गुरुवारचे (दि. 17)कमाल तापमान 36.6 अंश सेल्सियस नोंदविले गेले. इतर विभागांत जास्त तापमान आहे.
दक्षिण व उत्तर रायगडात सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे उन्हाची तमा न बाळगता उमेदवार व कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
19 तारखेला जाहीर प्रचार थांबणार आहे. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. ऊन जास्त असल्यामुळे प्रचार सकाळी उन्हाच्या आधी सुरू होतो. सूर्य डोक्यावर आल्यावर प्रचाराचा वेग मंदावतो आणि ऊन थोडे कमी झाले की पुन्हा प्रचाराचा वेग वाढतो. तापमान वाढत असले तरी प्रचार जोमात सुरू आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सध्या तापमानाबरोबरच राजकीय वातावरणदेखील तापले आहे.