दिवेआगरमध्ये सुवर्णगणेशाची पुन:प्रतिष्ठापना
अलिबाग ः प्रतिनिधी
सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाच्या अंगारक चतुर्थीनिमित्त जिल्ह्यातील गणेश मंदिरे मंगळवारी (दि. 23) भाविकांनी फुलली होती. कोरोनानंतर प्रथमच आलेला अंगारक योग साधून भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, दिवेआगर येथील सुवर्णगणेशाची पुन:प्रतिष्ठापनाही भक्तिभावाने करण्यात आली.
कोरोना महामारीमुळे गेले दीड वर्ष मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांना देव-देवतांचे बाहेरून दर्शन घ्यावे लागत होते. अखेर मंदिरे उघडली. त्यानंतर आलेल्या अंगारक चतुर्थीला भाविकांचा उत्साह दिसून आला.
अंगारक चतुर्थीचे औचित्य साधून श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्णगणेशाची उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुन:प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक उपस्थित होते.