पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 19) शेवटच्या दिवशी खारघरमध्ये भरपावसातही झालेल्या बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीत युवकांसोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी ‘एकच वादा… प्रशांतदादा’चा जयघोष निनादला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेक्टर 21मधील सचिन तेंडुलकर मैदानाजवळ बाइक रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत नगरसेवक, नगरसेविका, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, शंकरशेठ ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी जागोजागी आमदार प्रशांत ठाकूर यांचे औक्षण केले जात होते, तसेच नागरिक प्रतिसाद दर्शवत होते. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली कामे पनवेलच्या विकासात महत्त्वाची ठरली आहेत. राज्यभरात त्यांचा गौरव झाला. सर्व पनवेलकरांना या कार्यतत्पर लोकप्रतिनिधीचा नेहमीच अभिमान राहिला आहे. त्याची प्रचिती रॅलीतही आली.
आमदार प्रशांत ठाकूर हे सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्त्व आणि दांडगा जनसंपर्क असलेले नेते असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते जातपात, धर्म, पंथ न मानता माणुसकी हाच एक धर्म मानणारे असल्याने त्यांना सर्व समाजातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे. आजपर्यंत झालेल्या झंझावाती प्रचारातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची हट्ॅट्रिक एक लाखाच्या मताधिक्याने होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.