Breaking News

मतदार जागृतीसाठी उरणमध्ये वॉकेथॉन

उरण ः प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार उरणमध्ये मतदार जागृती वॉकेथॉनचे आयोजन केले होते. या उपक्रमात फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व उरणमधील ज्ञानपीठ कला व वाणिज्य महाविद्यालय सहभागी झाले होते.

उरणच्या नानासाहेब धर्माधिकारी जिल्हा परिषद शाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वॉकेथॉन उपक्रमाचे उद्घाटन नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवधूत तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी फुंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे उपस्थित होते. या वेळी फुंडे महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र व डीएलएलईच्या विद्यार्थ्यांनी डॉ. संदीप घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बसवलेले पथनाट्य सादर केले. त्याला उपस्थितांनी दाद दिली.

पथनाट्याच्या सादरीकरणानंतर उरण शहरातून वॉकेथॉन फेरी काढण्यात आली. या वॉकेथॉनमध्ये डीएलएलई, एनएसएस व एनसीसी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उरण तहसीलमधील पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी विद्यार्थ्यांकडून ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. वॉकेथॉन फेरीच्या समारोपानंतर संतोष पवार यांनी सर्वांचे आभार मानले, तसेच नवतरुणांमध्ये मतदार जागृती करण्यासाठी शासनाच्या वतीने वीर वाजेकर महाविद्यालयात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते, तसेच राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आदिवासी पाड्यामध्ये जाऊन पथनाट्याचे सादरीकरण यशस्वीरीत्या करण्यात आले. शासनाच्या या सर्व उपक्रमात वीर वाजेकर महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग, डीएलएलई विभाग, एनएसएस विभाग व एनसीसी विभाग यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिल्याचे रायगडच्या जिल्हाधिकार्‍याने सांगितले. या सर्व उपक्रमाचे नियोजन व संयोजन संतोष पवार, डॉ. संदीप घोडके, डॉ. अमोद, डॉ. आर. एस. म्हात्रे यांनी केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply