नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी उमेदवारांचा फंडा
नवीन मुंबई ः रामप्रहर वृत्त : ठाणे लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदारसंघातून खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच असणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. काठावर असलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढली जात आहे. त्यासाठी रात्रीच्या पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत.
काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या महिनाभर चालणार्या खानावळीसाठी शहरातील हॉटेल्सच बुक करून ठेवल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे शहराबाहेरील फार्महाऊसवरही कार्यकर्त्यांसाठी गटागटाने दारू आणि मटणाच्या पार्ट्या झडत आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यातच खरी चुरस असणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने शिवसेना-भाजपा युतीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून विजयाच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. राष्ट्रवादीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम वॉर्ड पदाधिकार्यांचा मेळावा घेऊन कामाला लागण्याचे आवाहन केले. त्यानंतर गेल्या आठवड्यात शिवसेनेने पदाधिकार्यांची बैठक घेतली. ठाणे लोकसभा मतदारसंघातून 9 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतरच खर्या अर्थाने प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे, मात्र तत्पूर्वी नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट बांधणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या धुरिणांनी कंबर कसली आहे. नाराज कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी रात्रीच्या मेजवानीचे नियोजन केले जात आहे. या जेवणावळीची जबाबदारी त्या त्या विभागातील प्रमुख पदाधिकार्यांवर देण्यात आली आहे. त्यानुसार ठरावीक हॉटेल्स महिनाभरासाठी बुक करण्यात आली आहेत.
सध्या या हॉटेल्समधून दिवसभरात 40 ते 50 कार्यकर्त्यांच्या पार्ट्या झडत आहेत. महत्त्वाचे कार्यकर्ते, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदींची शनिवार आणि रविवारी लोणावळा, कर्जत, खालापूर, अलिबाग तसेच मुरबाड येथील फार्महाऊसवर आवभगत केली जात आहे. याचा परिणाम म्हणून या विभागात वाहनांची रेलचेल वाढल्याचे दिसून येते.
निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली नसल्याने सध्या खानावळीचे स्वरूप मर्यादित आहे; परंतु 10 एप्रिलपासून या पार्ट्यांचा खर्या अर्थाने धडाका सुरू होणार आहे. त्यादृष्टीने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आतापासून नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी कार्यकर्त्यांसह त्या त्या विभागातील मतदारांवर प्रभाव टाकणार्या विविध क्षेत्रातील धुरिणांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.