Breaking News

राहुल वैद्य : कर्जतचं सांस्कृतिक वैभव

डोंबिवलीसारख्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत जन्मल्यानंतर जातिवंत कलाकार घडतो हे त्रिवार सत्य आहे. त्याच डोंबिवलीमध्ये जन्मलेले राहुल वैद्य आज नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मोठे नाव समजले जातात. डोंबिवलीमधील साहित्य, नाट्य, सांस्कृतिक चळवळीत हिरिरीने स्वतःला झोकून देत काम करण्याची राहुल यांची वृत्ती

खरंतर त्यांच्या वाटचालीचे आणि यशाचे गमक म्हणायला हवे. मूळचे डोंबिवलीकर असलेले राहुल यांचा जन्म आणि प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण डोंबिवलीमधील टिळकनगर विद्यालयात झाले. त्यामुळे आपोआप त्यांच्यावर सांस्कृतिक परंपरेचा वारसा शाळेपासून सुरू झाला. त्यात तेदेखील समरस होऊन नाट्य चळवळीत स्वतःला सिद्ध करू शकले आणि त्यामुळे मोठे होऊ शकले. टिळकनगर शाळेत नववीमध्ये असताना त्यांनी आंतरशालेय स्पर्धेसाठी एकांकिका बसविली होती. तेथून सुरू झालेला प्रवास राज्य हौशी नाट्य स्पर्धेतील विजयापर्यंत आणि पुढे त्याच संस्थेच्या स्पर्धेत परीक्षकापर्यंतचा प्रवास त्यांच्या अभिनय, लेखन कर्तृत्वाला दाद द्यावा असाच आहे. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवन सुरू झाल्यावर डोंबिवलीमधील आकार संस्थेने त्यांना नैपथ्यपासून बॅक स्टेजवरील सर्व कामे सांभाळण्याची जबाबदारी दिली आणि हीच जबाबदारी आपल्याला चांगला कलावंत घडविण्यास मदतगार ठरली, असे राहुल वैद्य यांना वाटते. त्यात आनंद म्हसवेकर, दिलीप कोल्हटकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या सान्निध्यात राहून त्यांच्याकडून जेवढे शिकता येईल ते सर्व राहुल यांनी आत्मसात केले. पुढे त्यांचे आकार संस्थेतील कार्य पाहून संजय धवडे या नामांकित कला दिग्दर्शकांनी अनेक जबाबदार्‍या दिल्या. त्यात नाट्यभूमीवर नाटक सादर होत असताना ते संहितेनुसार सादर होते की नाही हे पाहण्यापासून ते नैपथ्यची जबाबदारी त्यात असायची. त्यामुळे तावून सुलाखून तयार झालेले राहुल वैद्य यांनी 1987 ते 1989 या काळात राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आपली कलाकृती पेश केली. वैवाहिक आणि व्यावसायिक कारणामुळे मधली पाच वर्षे नाट्य चळवळ आणि या क्षेत्रापासून दूर झालेले राहुल यांनी कर्जत येथे आपल्या सासूरवाडीतील गावात येऊन पुन्हा एकदा नाट्य चळवळ सुरू केली. खर्‍या अर्थाने 1993मध्ये नाट्य प्रवास सुरू करणारे राहुल वैद्य यांनी कर्जत या कलावंतांच्या भूमीमध्ये राज्य नाट्य स्पर्धेसाठी कलाकार घडविण्यास सुरुवात केली. दिशा केंद्र ही संस्था त्यावेळी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित करायची. दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेऊन कर्जतमधील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 2000 साली नाट्य कलाकार संघ स्थापन केल्यानंतर सहा नाटके दिग्दर्शित केली. त्यातील कणकवली येथे झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत ’फारफार तर काय’ या नाटकाला उत्कृष्ट दिग्दर्शक, तसेच तीन कलाकारांना राज्य शासनाचे तीन पुरस्कार मिळाले. त्यामुळे लेखक आणि कलावंत तसेच दिग्दर्शक अशी भूमिका वठवत असताना त्यांची दोन अंकी दोन नाटके रंगमंचावर आली असून त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. डोंबिवलीमधून अभिनयाची परंपरा कर्जतमध्ये आणून कर्जतमध्ये आपल्या सहकार्‍यांना घडविणार्‍या या कलाकाराला प्रेक्षकांनी अनेक मालिकांमध्ये दूरचित्रवाहिनीवर पाहिले आहे. सह्याद्री वाहिनीवरील तुंबाडेचे खोत या पुस्तकावर आधारित मालिकेतून पुढे आलेल्या राहुल वैद्य यांना मग अनेक दूरचित्रवाहिन्यांवर अभिनय करण्याची संधी मिळाली आहे.राजा शिवछत्रपती, संत तुकाराम, ही वाट दूर जाते, बाजीराव मस्तानी, विठू माऊली, अनोळखी दिवस, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्यजननी जिजामाता, तू माझा सांगाती, जय मल्हार, उंच माझा झोका, गणपती बाप्पा, गर्ल हॉस्टेल, खुलता कळी खुलेना अशा मालिकांतून राहुल वैद्य यांनी आपली छाप पाडली. नाट्यभूमी कलावंत म्हणून पुढे आलेले राहुल यांना डॉ. अमोल कोल्हे यांच्या भगवा या तीन पात्री नाटकात अभिनय करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी संदीप कुलकर्णी यांच्या ‘तुम्ही आम्ही’मधील अभिनयही रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा आहे. त्यांचा गंध मनाचा हा गाण्यांचा अल्बम प्रसिद्ध झाला असून मागील सहा वर्षे ते राज्य नाट्य स्पर्धेत परीक्षक म्हणून जाताहेत. मुंबई विद्यापीठाकडून आयोजित युथ फेस्टिव्हलमध्ये त्यांना मागील चार वर्षे ज्युरी म्हणून बोलावले जात आहे. त्याचवेळी राज्य शासनाने त्यांना रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून घेतले असून 2021पर्यंत त्यांची मुदत आहे. लेखक, अभिनेते, दिग्दर्शक या भूमिका वठवत असताना आता त्यांनी नाट्य क्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या तरुणांना व्हाईस ओव्हर, लिखाण, स्क्रिप्ट काय असते यावर मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली असून कर्जतमध्ये ते अशा तरुण कलाकारांसाठी उपलब्ध असतात. नुकत्याच झालेल्या 56व्या राज्य चित्रपट महोत्सवात राहुल वैद्य यांच्याकडे ज्युरीची जबाबदारी देण्यात आली होती.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply