Breaking News

उरण विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

उरण ः प्रतिनिधी

राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत असून, 190-उरण विधासभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. उरण मतदारसंघात एकूण 327 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रात केंद्राध्यक्षासह एकूण सहा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकंदरीत 327 मतदान केंद्रांमध्ये एकूण एक हजार 962 एवढ्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती उरण मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी आश्विनी पाटील यांनी दिली आहे.

उरण मतदारसंघातील मतदान केंद्रांमध्ये निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी झाली असून, आज निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उरण तालुक्यात नवी मुंबई पोलीस आयुक्त परिमंडळ-2चे उपायुक्त अशोक दुधे यांच्या अधिपत्याखाली  2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह 178 पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांचे 90 पोलीस कर्मचारी असा एकूण 286 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, विशेष म्हणजे या निवडणुकीत उरण तालुक्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याने मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडेल, अशी अपेक्षा उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. तर उरण मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांसाह एकूण 8 उमेदवार असून, विद्यमान आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्यामध्ये अतिशय चुरशीची तिरंगी लढत होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अतुल भगत, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राकेश पाटील, बहुजन समाज पार्टीचे संतोष पाटील यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवार मधुकर कडू व संतोष भगत हे आपले नशीब अजमावत आहेत.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply