श्रीनगर : वृत्तसंस्था
भारतात दहशतवादी घुसवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने रविवारी (दि. 20) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्येे पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेले चार दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले. या कारवाईत पाकच्या पाच सैनिकांसह 20 ते 22 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या वेळी दोन भारतीय जवानांना वीरमरण आले, तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यापासून भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने तंगधार सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारताचे दोन जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला, तसेच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पाकच्या गोळीबारानंतर घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने हल्ला चढवला. या धडाकेबाज कारवाईत नीलम व्हॅलीतील चार दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले. यात पाकच्या चार ते पाच सैनिकांसह 20 ते 22 दहशतवादी ठार झाले आहेत.