पनवेल ः बातमीदार
गावठाणाच्या हद्दीत 200 मीटर अंतरावर नैसर्गिक गरजेपोटी वाढलेली घरे नियमित करण्याचे परिपत्रक काढण्यात आले असले तरी सिडकोकडून स्थानिकांनी आकार वाढवलेल्या घरांवर कारवाई केली जाते. ही कारवाई योग्य आहे का, हे निश्चित करण्यासाठी रोडपाली गावच्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने खासगी एजन्सी नेमून गावठाण मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 40 वर्षांपूर्वी जमीन संपादित झाल्यानंतर पनवेल, नवी मुंबईतील शेतकर्यांच्या जमिनीवर शहरे निर्माण केली. सुनियोजित शहरांमध्ये नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष दिले जाते. मात्र स्थानिकांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नैसर्गिक गरजेपोटी वाढवलेली घरे नियमित करण्यासाठी परिपत्रक काढले. गावठाणच्या 200 मीटर हद्दीतील घरे नियमित करण्यासंदर्भातील या परिपत्रकाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून गावठाण परिसरात वाढविलेल्या घरांवर कारवाई केली जाते. सिडकोने अनेक वर्षांत गावठाणाची मोजणी केली नसल्यामुळे नेमके गावठाणाचे क्षेत्र किती, हेदेखील सांगणे कठीण झाले आहे. महसूल विभागाकडून दर दहा वर्षांनी गावठाण विस्ताराचे सीमांकन होणे गरजेचे असताना ते झाले नाही. सिडकोकडून होणार्या कारवाईवर सिडकोला ठोस उत्तर देण्यासाठी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यासाठी पनवेल महापालिका हद्दीतील रोडपाली गावच्या ग्रामस्थांनी गावठाणाच्या विस्ताराची, गावठाण क्षेत्राची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी एजन्सीकडून करण्यात येणार्या मोजणीच्या कामाचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिकयांच्या हस्ते करण्यात आले.