उरण, पनवेल ः रामप्रहर वृत्त
दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी उरणकर सज्ज झाले असून खरेदीची लगबग अनेक बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. दागिने आणि कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. त्यामुळे सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशीही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दरम्यान, ऑक्टोबर हीटही वाढू लागली असली तरी खरेदीचा उत्साह टिकून आहे. दसरा झाला की, दिवाळीचे वेध लागतात. दिवाळीसाठी मग बाजारपेठाही हाउसफुल्ल होऊ लागतात. शहरासह बाजारपेठांमधील साहित्यांची आवक-जावक वाढू लागली आहे. बाजारपेठा फराळापासून ते फटाक्यांपर्यंत सज्ज झाल्या आहेत. सध्या बाजारांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. दसर्याच्याच दिवशी अनेक दुकानांनी दिवाळीसाठी लागणारे विविध साहित्य विक्रीसाठी मांडण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, ऐन दिवाळीत घाई होऊ नये, आणि मनपसंत वस्तू मिळावी, यासाठी अनेकांनी दिवाळीच्या खरेदीला सुरुवात केली आहे. सध्या दिवाळी साहित्यासोबतच कपडे आणि इमिटेशन दागिन्यांची खरेदी करताना अनेक जण दिसत आहेत. दोन-चार दिवसांत या खरेदीला वेग येणार असून बाजारपेठांतील गर्दी ओसंडून वाहणार आहे. घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. धावपळीच्या जीवनात घरात दिवाळीचे पदार्थ बनवणे शक्य नसणार्यांसाठी बाजारात विविध प्रकारच्या मिठाई उपलब्ध झाल्या आहेत. काजूकतली, अंजीर बर्फी, मावा पेढा या मिठाई ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. तर कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचार्यांना दिवाळीची भेट म्हणून मिठाई दिली जात असून यासाठी आतापासून दुकानात ऑर्डर दिल्या जात आहेत.
महागाई असली तरी नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी यांना मिठाई देण्यासाठी ऐन दिवाळीत ग्राहकांची गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे. काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे, त्यामुळे लोकांनी दिवाळीच्या खरेदीला सुरुवात केली असून यंदाच्या दिवाळीत महागाईचे चटके बसणार यात दुमत नाही. मिठाई, फराळ, फराळ बनवण्याचे साहित्य, कपडे, फटाके, रांगोळीचे रंग, कंदील, दिवे आदी गोष्टींची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात एकच गर्दी उसळून येते. मिठाई व फराळ बनवण्याची जबाबदारी महिलांची असून काही गृहिणी फराळ व मिठाईही घरीच बनवणे पसंत करतात. पण सर्वच महिलांना घरी फराळ बनवणे शक्य होत नाही. म्हणून मिठाईच्या दुकानातील तयार मिठाई व फराळ खरेदी करणे पसंत करतात. पण फराळ बनवण्यासाठी लागणार्या साहित्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे घरी मिठाई-फराळ बनवणे हेही सध्या खर्चाचे आहे. दुकानात मिठाई खरेदी करायची म्हटली तर, मिठाईत अनेक प्रकार आहेत. त्यामुळे लोक आपल्या आवडीप्रमाणे मिठाई खरेदी करतात. पण मिठाईच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मिठाई खरेदी करण्याअगोदर विचार करावा लागत आहे. काजुकतली, अंजीर बर्फी, आइस हलवा, मावा पेढा, ड्रायफ्रूट मिठाई या लोकांच्या आवडत्या मिठाईच्या किमतीही वाढलेल्या आहेत. दिवाळीचा सण आहे आणि गोडधोडसाठी मिठाई किंवा फराळ नसेल तर दिवाळी पूर्ण होत नाही. म्हणून महागडी असली तरीही सामान्य माणूस दिवाळी सणात मिठाई-फराळ थोड्या प्रमाणात तरी खरेदी करतो.