रांची : वृत्तसंस्था
टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करीत ‘व्हाइट वॉश’ दिला. या दौर्याबाबत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने मत व्यक्त केले.
भारतीय संघ फिरकी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या चारही विभागांत आमच्या दोन पावले पुढे होता. भारतीय संघाला कोणीही सहजासहजी हरवू शकत नाही. 2015नंतर भारतीय खेळपट्ट्यांवर खेळणे म्हणजे फिरकी गोलंदाजीविरोधात खेळण्याचा सराव करणे अशी आमची विचारसरणी होती, पण या दौर्यात अगदी उलट झाले. या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजीस पोषक ठरल्या. तीच आमची चूक झाली, असे प्लेसिस याने सांगितले.
पहिल्या सामन्यात आम्ही 431 धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र आमच्या संघाची जी अवस्था झाली ती अत्यंत विचित्र होती. सामन्यात असे अनेक क्षण होते, जेव्हा सामन्यात काहीही घडू शकले असते, पण त्या सगळ्या संधी आम्ही गमावल्या. सामन्यागणिक आमच्या चुका वाढतच गेल्या. भारतीय संघानेही त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. त्यामुळे त्यांना विजयाचे श्रेय नक्कीच द्यायला हवे. त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले, असेही तो म्हणाला.
आमच्यासाठी सकारात्मक बाब म्हणजे आमच्या संघातील काही युवा खेळाडूंना चांगला अनुभव मिळाला. आमच्यासाठी हा सर्वात कठीण दौरा होता, असेही प्लेसिसने नमूद केले.