Breaking News

सकारात्मकतेचा परिसस्पर्श

नेहमीच्या जगण्यातल्या चिंता-विवंचना कुठे पळून जाणार नसतात. पण दिवाळीच्या दिवसांत त्या नजरेआड करून आपल्या जिवाभावाच्या माणसांसोबत चार दिवस अगदी मनापासून आनंद आणि उत्साहातच घालवायचे असा निश्चय जणु काही आपसूकच प्रत्येकाच्या मनात साकारतो. दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले…

नैराश्याचा झाकोळ दूर करून मन आनंद, उत्साहाने भारून टाकण्याची जादू लीलया करणारा दीपोत्सव सालाबादप्रमाणे अवतरला आहे. नको इतका लांबलेला पावसाळा, कालच आटोपलेला निवडणुकांचा हंगाम आणि त्यात ऑक्टोबर महिन्यातच अवतरलेली दिवाळी यामुळे तिच्या स्वागताची तयारी करताना बहुतेकांची यंदा काहिशी धांदल उडाल्यासारखी भासते आहे. आधी पावसाने उसंतच दिली नव्हती, मग मुलांच्या परीक्षाच सुरू झाल्या अशा नानाविध महत्त्वाच्या आणि बिगरमहत्त्वाच्या कामांच्या रगाड्यात दिवाळीची तयारी यंदा थोडीशी रेंगाळली असली तरी एकदा रस्तोरस्तीची दुकाने कंदिल आणि दिव्यांच्या तोरणांनी झगमगून उठली की तयारीला न लागलेला प्रत्येक जण आपसूकच दिवाळीच्या स्वागताला सरसावतो. गेल्या आठवड्याच्या अखेरीला दुकानांमध्ये अशाच लगबगीने खरेदीला आलेल्यांची झुंबड दिसली होती. पुन्हा दोन दिवस निवडणूक आणि निकालांचा विराम येऊन गेला. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव जोपासणार्‍या जनतेने  दिवसभरासाठी वैयक्तिक पातळीवरची कामे, दिवाळीची तयारी बाजूला ठेवून आवर्जून मतदान केले. 2014 पासून देशवासियांच्या मनात एक आगळी उमेद, आगळा हुरुप संचारलेला आहे. भ्रष्टाचाराचा अंध:कार मागे टाकून प्रगतीच्या, विकासाच्या उजळलेल्या वाटांवर नव्या उमेदीने देश पुढे पाऊल टाकतो आहे. सांस्कृतिकदृष्ट्या भारत देश कायमच अग्रेसर राहिला आहे. अभिजीत बॅनर्जी यांना अलीकडेच मिळालेला नोबेल पुरस्कार हे त्याचे ताजे उदाहरण म्हणता येईल. इतरही अनेक क्षेत्रांत भारतीयांची कर्तबगारी आंतरराष्ट्रीय समुदायाला मान उंंचावून त्यांच्याकडे पाहायला लावणारी आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राजवटीत देश दिमाखाने जागतिक महासत्तांच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरताना दिसतो आहे. देश पातळीवरही महत्त्वाची आश्वासने प्रत्यक्षात साकारताना दिसू लागल्यामुळे जनतेच्या आशा उंचावल्या आहेत. ज्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे, अशा भारत देशातील जनता सकारात्मकतेने जगण्याला सामोरी जाताना दिसणे स्वाभाविकच आहे. त्यातच मुळात आपली भारतीय संस्कृती ही हरतर्‍हेच्या परिस्थितीत सणासमारंभांच्या माध्यमातून सकारात्मक मानसिकता जोपासणारी आहे. म्हणूनच हिवाळ्याच्या ऋतुत अंधाराचे आणि थंडीचे साम्राज्य जगण्याला वेढून टाकण्याच्या आधीच दिव्यांच्या झगमगाटातून मनाला उभारी देण्याचे काम दिवाळी करते. आधुनिक काळात दिवाळीचा झगमगाट आजच्या चंगळवादी जगण्याला साजेसाच असला तरी मुळातले तिचे स्वरुप हे आनंदाची मनमुराद उधळण करणारेच आहे. तिच्या या रूपाचा परिसस्पर्श म्हणूनच देशाच्या कानाकोपर्‍यात शहरी, ग्रामीण दोन्ही भागांत, गरीब-श्रीमंत सार्‍यांच्याच घरी झालेला दिसतो. तर अशा या आनंदमयी, तेजोमयी दीपावलीच्या ‘दैनिक रामप्रहर’च्या वाचक, वितरक आणि जाहिरातदारांना लाख लाख शुभेच्छा!

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply