
पनवेल : प्रतिनिधी
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्यांची त्यादृष्टीने शेतीची तयारी सुरू झाली आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला ओळखले जात होते. काळातराणे पनवेल परिसराचा झपाट्याने विकास झाला. भातशेती नष्ट झाली असली, तरी देखील उर्वरित शिल्लक राहिलेल्या जागेवर अद्याप मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात असून सध्याच्या घडीला भातशेतीचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.
सुधारीत संशोधित भातामधील शुभांगी, सोनम आणि कोमल, मोहिनी, रत्ना, रूपाली, जया, लक्ष्मी, क्रांती आदी भातबियाण्याला सर्वाधिक शेतकर्यांची मागणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भात बियाणांमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पनवेलसारख्या विकसित तालुक्यात ग्रामीण भागात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. ग्रामीण भागात देखील सिडकोने नैना प्रकल्प आणल्याने कालांतराने येथील भातशेती नष्ट होणार आहे, मात्र अद्याप या ठिकाणी भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. पनवेल परिसरातील भातशेती करणे तसे जिकिरीचेच काम आहे. शहरी भाग असल्यामुळे पेरणी करण्यासाठी लागणारा मजूर दुर्लभ होत चालला आहे. एका मजुरासाठी दिवसाला पाचशे रुपये मोजावे लागतात, तसेच त्याच्यासोबत दोन दिवसाचे जेवण, नाष्टा आदी द्यावे लागत असल्याने अनेकांना भातशेती करणे परवडत नाही, मात्र तालुक्यातील प्रगतशील शेतकर्यांनी अद्याप हा वारसा टिकवून ठेवला आहे. पनवेलमधील खार जमीन संशोधन केंद्रात, तसेच कर्जतमध्ये देखील भात बियाणे तयार केली जातात. प्रगतशील शेतकरी अशाप्रकारे बियाणे तयार केलेल्या ठिकाणाहून भात बियाणे खरेदीला प्राधान्य देत असल्याचे पनवेलमधील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत भगत यांनी सांगितले. भातबियाणे तयार केल्या जाणार्या केंद्रांवर त्या बियाणांची चाचणी घेतली जाते. हेक्टरी किती उत्पन्न बियाणांमार्फत मिळेल, आदी बारकाईने गोष्टीची काळजी त्या केंद्रांवर कृषितज्ज्ञांच्या उपस्थितीत घेतली जात असल्याची माहिती भगत यांनी दिली. सध्याच्या घडीला आंध्र प्रदेश, गुजरात राज्यातून देखील बियाणे नाव्याने बाजारात दाखल होत आहेत. 10 ते 12 रुपये प्रति किलोग्रॅम भाताचे बियाणे साधारणतः विक्री केली जाते. यापेक्षा चांगल्या कंपनीचे बियाणे 20 ते 25 रुपये प्रति किलोग्रॅमने देखील विक्री केली जातात.
भातविक्री केंद्रावर सरकारचे नियंत्रण हवे
भातविक्री केंद्रांवर दुकानदारांमार्फत बियाणांबद्दल माहिती देताना योग्य माहिती दिली जात नसल्याने शेतकर्याला त्याचा फटका बसतो. अशा परिस्थितीत सरकारने भातविक्री केंद्रावर कृषिअधिकारी किंवा शेतीतील जाणकार उपलब्ध करून दिल्यास शेतकर्यांची फसवणूक होणार नाही. याचा फायदा त्या शेतकर्याला भातशेतीतून अधिक नफा मिळण्यास होईल, अशी सूचना पळस्पे येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत भगत यांनी केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper