जेएनपीटी : प्रतिनिधी
बम बम भोले, हर हर महादेव, ओम नमः शिवायचा गजर करत समुद्रावर स्वार होत काल हजारो शिवभक्तांनी घारापुरी येथील प्रसिद्ध शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी उरण, पनवेल, नवी मुंबई आणि मुंबई येथून दरवर्षी जवळजवळ 50 ते 75 हजार शिवभक्त घारापुरी येथे येतात.
घारापुरी येथे जाणार्या शिवभक्तांसाठी मेरीटाईम मंडळाकडून उरण-मोरा, जेएनपीटी, न्हावा व गेट वे ऑफ इंडिया येथून खास बोटींची व्यवस्था करण्यात आली होती. मेरीटाईम मंडळ येथील स्थानिक मच्छीमारांच्या बोटी महाशिवरात्रीसाठी भाड्याने घेऊन शिवभक्तांच्या प्रवासासाठी ठेवण्यात आल्या होत्या. मोरा बंदरातून सर्वांत जास्त शिवभक्त घारापुरी येथे शिवदर्शनासाठी जात होते.
तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, आवरे, केगाव व उरण शहर, खोपटा, कोटनाका गाव, शेवा, चिर्ले, जासई, पिरकोन, रानसई, करळ, सोनारी आदी गावांतील शिवमंदिरात भाविकांनी महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. मंदिरात काकड आरती, अभिषेक, भजन, कीर्तन
कार्यक्रमाचे आयोजन उत्सव कमिटीच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यात यंदा महाशिवरात्र उत्सव सोमवारी आल्याने मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी भरली होती.