Breaking News

नागोठणे विभागातील शेकडो एकर भातशेतीला वादळी पावसाचा फटका

नागोठणे : प्रतिनिधी

‘क्यार’ वादळाच्या पार्श्वभूमीवर पडलेला पाऊस आणि वादळाचा फटका नागोठणे विभागातील शेकडो एकर भातशेतीला  बसला असून हातातोंडाशी आलेले पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त शेतीची महसूल विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी रोहे तालुका कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष शिवराम शिंदे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात पडलेला मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍याने नागोठण्यासह विभागातील मुरावाडी, निडी, कोंडगाव, बाहेरशीव, पळस, शेतपळस, वाघळी, वरवठणे गावातील शेतकर्‍यांची भातशेती जवळपास नष्ट झाली असल्याची भीती शिवराम शिंदे यांनी व्यक्त केली आहे. साधारणतः नवरात्रीदरम्यान या भागात भातकापणीला प्रारंभ केला जातो, मात्र ऑक्टोबर महिना येऊनही पावसाचा जोर कमी होत नसल्याने अनेक भागांत भातकापणी झालीच नव्हती. काहींनी कापणी केलेले भात शेतातच आडवे टाकून ठेवले होते. गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कापलेले भात जवळपास नष्टच झाले आहे, तर जे तयार पीक शेतात उभे होते. त्याचे दाणे पावसाने गळून शेतात साचलेल्या पाण्यात भिजून गेले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

येथील शेतकर्‍यांचे भातशेती हेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असून, येथील शेतकर्‍यांचे हातातोंडाशी आलेले पीक हातातून जात असल्याने आमच्या घरातील दिवाळीसुद्धा आम्हाला गोड लागली नसल्याचे शेतकर्‍यांनी हताशपणे सांगितले.

शिवराम शिंदे यांच्या म्हणण्यानुसार भाताचे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली असतानाच आंब्यासह इतर फळझाडांनासुद्धा कीड लागली असल्याने हे पीक तरी हातात येईल का, या विचाराने येथील फळ बागायतदार चिंतीत झाला असून, शेतकर्‍यांनी आता नक्की करायचे तरी काय, या भीतीने सर्व जण ग्रासले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply