नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत आहे. इतकेच नव्हे तर शिवरायांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 13) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना शंभराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष संदेश दिला. त्या वेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. भारताचा भूगोलसुद्धा त्यांच्या अमरगाथेने प्रभावित झालेला आहे. आपल्या या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केल्यावर एक खूप मोठा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते? छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या सध्याच्या स्वरुपाची, भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच महाराजांबद्दल बाबासाहेब पुरदरेंना एवढी भक्ती आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. मी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभावे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या.