कर्जत : बातमीदार
हुतात्मा हिराजी पाटील यांनी 28व्या वर्षी देशासाठी शहीद होऊन केलेले काम न विसारण्याजोगे आहे. हा इतिहास जिवंत करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी जो प्रयत्न केला आहे, तो काळजाचा ठोका चुकविणारा आहे. त्यामुळे त्यांना आपला सलाम आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी काढले. हुतात्मा हिराजी पाटील आणि जानकीबाई पाटील यांच्या मानस सूनबाई अनुसया गोपाल जामघरे यांच्या ’समर्पणाला वंदन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन सिंधूताई सपकाळ यांच्या माजरी येथील आश्रमात करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात सिंधूताई बोलत होत्या. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या सूनबाईंनी आपले आत्मचरित्र लिहून समाजाला त्या काळाची आठवण करून दिली असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. क्रांतिकारकांच्या घरातील वातावरण नेहमी एका विशिष्ट प्रकारच्या ध्येयाने भारलेले असायचे. त्यामुळे त्या घरात सूनबाई म्हणून वावरणे आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हेच खरे भाग्य आहे. ती संधी आणि भाग्य अनुसयाबाईंच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्या भाग्यवंत आहेत, असे सिंधूताईंनी या वेळी सांगितले. हुतात्म्यांनी केलेल्या त्यागाचे युवा पिढीला विस्मरण होत आहे, पण अनुसया जामघरे यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना लिहिण्याची प्रेरणा दिली आणि एक समर्पित इतिहास शब्दबद्ध झाला आहे, असे प्रा. सुरेश अत्रे यांनी सांगितले. साहित्यिक शाळिग्राम भंडारी, सिद्धगड येथील हुतात्म्यांच्या लढ्याचे अभ्यासक गिरीश कंटे, लेखिका अनुसया जामघरे यांची मुलगी शैला एकनाथ भोईर, जावई एकनाथ भोईर, नातू कल्पेश भोईर या कार्यक्रमाला उपस्थित होते.