Breaking News

विस्तारवादाचे युग संपले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा

लडाख : वृत्तसंस्था
भारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या काही काळात विस्तारवादाने मानवतेचा विनाश केला, मात्र आता विस्तारवादाचे युग संपले असून, जग विकासाकडे वाटचाल करीत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 3) अचानक लडाखचा दौरा केला आणि आपल्या सैनिकांची भेट घेतली. या वेळी पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांचे मनोबलही वाढवले.
लडाख दौर्‍यावर गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी लेहमधील निमू भागाला भेट देऊन रुग्णालयात असलेल्या जखमी जवानांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या 20 जवानांना श्रद्धांजली वाहिली. मग सैनिकांना संबोधित करताना संपूर्ण लडाख हा भारताचा आत्मसन्मान आहे, असे महत्त्वाचे विधान त्यांनी केले.
जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे, पण गेल्या काही काळात विस्तारवादाने मानवतेचा विनाश करण्याचे काम केले. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणार्‍या शक्ती पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या याचा इतिहास साक्षीदार आहे. संपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटले आहे, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
संपूर्ण देशातील जनता आज आपल्या सैनिकांना आदरपूर्वक नमन करीत आहे. प्रत्येक भारतीयाची छाती तुमचे शौर्य आणि पराक्रमामुळे फुगलेली आहे. ही धरती शुरांची आहे आणि तिचे संरक्षण करणे हाच आपला संकल्प आहे. 14 कोअरच्या शौर्याचे किस्से सगळीकडे पसरले आहेत. संपूर्ण जगाने तुमचे अदम्य साहस पाहिले. आपल्या शौर्यगाथा घराघरात दुमदुमत आहे. भारताच्या शत्रूंनी तुमची आगही पाहिली आणि तुमचा रागही पाहिलेला आहे. जेव्हा जेव्हा देशाच्या रक्षणाशी संबंधित निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मी सर्वप्रथम मातांचे स्मरण करतो. पहिली माता आपली भारतमाता आहेत आणि दुसरी त्या वीरमाता ज्यांनी सैनिकांना जन्म दिला, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांचा गौरव केला.
जवानांचे शौर्य हिमालयापेक्षा मोेठे
या वेळी भारतीय जवानांना उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, तुमचे शौर्य, भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करीत असलेले समर्पण अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठीण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातील कशाचीच होऊ शकत नाही. तुमचे शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठे आहे. तुमचे बाहू येथील पर्वतरांगांसारखेच बळकट असून, तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे. मी हा सगळा अनुभव घेतो आहे. त्याचेच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरूपाने उतरले आहे असे म्हणत त्यांनी जवानांचे कौतुक केले. सीमाभागात पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा तीन पट अधिक खर्च करीत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply