Breaking News

साहित्यिका गिरिजा कीर यांचे निधन

मुंबई : सुप्रसिद्ध साहित्यिका, कथाकथनकार व समाजसेविका गिरिजा कीर यांचे गुरुवारी (दि. 31) रोजी सायंकाळी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. गेले काही महिने त्या आजारी होत्या. त्यांची शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक पुरस्कार व मानसन्मानाच्या त्या मानकरी आहेत. तळागाळातील गरजूंसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कारानेही त्या सन्मानित झालेल्या आहेत. सारस्वत चैतन्य त्रैमासिकाच्या स्थापनेपासून भूतपूर्व संपादक कै. प्रफुल्लदत्त व कै. रवींद्र पाटकर यांच्या सोबत सारस्वत चैतन्यच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे बहुमोल साहित्य योगदान लाभले आहे. गेली 10 वर्षे संस्कारदीप दिवाळी अंकासाठीही त्यांनी अतिशय आपुलकीने कथा लेखन सहाय्य केले. या वर्षीही त्यांची तब्येत बरी नसतानाही वरील दोन्ही दिवाळी अंकांना त्यांनी कथा पाठविल्या आहेत. दिवाळी अंकही प्रसिद्ध झाले आहेत.

राजकीय जाहिरातींना ट्विटरबंदी

नवी दिल्ली : अत्यंत कमी वेळात तरुणांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं प्रमुख साधन असलेल्या सोशल मीडियावरील ट्विटरनं आता राजकीय जाहिरातींना बंदी घातली आहे. त्यामुळं ट्विटरवर आता राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. जगभरात ही बंदी घालण्यात आली आहे. 22 नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. ट्विटरवर 22 नोव्हेंबरपासून राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. कंपनीनं जगभरात राजकीय जाहिरातींवर बंदी घातली आहे.

भारताची चीनला चपराक

नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीरचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयावर टीका करणार्‍या चीनला भारताने खडेबोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा भारताचा निर्णय बेकायदा आणि निरर्थक असल्याची टीका चीनने केली होती. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत कठोर शब्दांत चीनला प्रत्युत्तर दिले आहे. चीननेच जम्मू-काश्मीरच्या काही भागावर बेकायदा ताबा मिळवल्याचे भारताने म्हटले आहे. ज्याप्रमाणे भारत दुसर्‍या देशांच्या अंतर्गत विषयावर भाष्य करत नाही, त्याप्रमाणे चीनसह अन्य देशांनी भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. त्यानंतर तीन महिन्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply