Breaking News

पीएमसी बँक ः आणखी एका खातेदाराचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर

पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही, या चिंतेत असलेल्या आणखी एका खातेदार महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. कुलदीपकौर विग (64) असे या महिलेचे नाव असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये सुमारे 17 लाख रुपये अडकले होते. दरम्यान, कुलदीपकौर या पीएमसी बँकेसंदर्भातील बातम्या पाहून झोपी गेल्यानंतर दोन तासातच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

या घटनेतील मृत कुलदीपकौर विग (64) या खारघर सेक्टर-10 मध्ये पती, मुलगा, सून व विधवा मुलगी यांच्यासह भाड्याच्या खोलीत राहण्यास होत्या. पीएमसी बँकेमध्ये कुलदीपकौर व त्यांचे पती वरिंदरसिंग विग, मुलगा सुखबिरसिंग या तिघांचे खाते असून या तिघांचे पीएमसी बँकेमध्ये 15 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझीट होते, तसेच कुलदीपसिंग व वरिंदरसिंग या पतीपत्नीच्या खात्यामध्ये दीड लाख रुपयांची, तर सुखबीर याच्या खात्यामध्ये 70 हजारांची रक्कम होती, मात्र घोटाळ्यामुळे पीएमसी बँकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर देशभरातील हजारो खातेदारांचे पैसे या बँकेत अडकले. यात खारघरमध्ये रहाणार्‍या विग कुटुंबीयांचे देखील सुमारे 17 लाख रुपये अडकले होते. पैसे नसल्याने विग कुटुंबीयांनी या वर्षी दिवाळी देखील साजरी केली नाही. त्यामुळे बँकेत अडकलेली ही रक्कम मिळेल की नाही, या चिंतेत विग कुटुंबीय होते. आपल्या ठेवी व पैसे बुडतील अशी भीती कुलदीप कौर यांना होती. त्यामुळे कुलदीप कौर या दरदिवशी पीएमसी बँकेशी संबधित बातम्या बघत होत्या. त्या झोपायला जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या पतीशी बँकेत अडकलेल्या त्यांच्या पैशासंदर्भात चिंता व्यक्त केली. त्यानंतर दोन तासातच त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाने व पतीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply