पनवेल : बातमीदार
गेल्या तीन दिवसांपासून वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पनवेल तालुक्यातील मोहो गाव अंधारात आहे. दरम्यान, विजेअभावी अंधारातच राहण्याची वेळ नागरिकांवर आली असून मच्छरांचाही उपद्रव वाढला आहे.
पनवेल तालुक्यातील मोहो गावाची लोकसंख्या पंधराशेहून अधिक आहे. या गावातला वीजपुरवठा करण्यासाठी बसविलेला वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर गेल्या तीन दिवसांपूर्वी जळाला आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे गावात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. विजेअभावी गावातील पाणीपुरवठा करणार्या मोटार बंद आहेत. त्यामुळे गावचा पाणीपुरवठाही बंद असून महिला वर्गाला डोक्यावर पाणी वाहावे लागत आहे. विजेअभावी विद्युत उपकरणे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मच्छरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची झोपमोड होत असून डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना आमंत्रण मिळत आहे.