पनवेल : वार्ताहर
कोकण एज्युकेशन सोसायटीचे विठोबा खंडाप्पा हायस्कूलचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष. व्हीके नावाने प्रचलित या शाळेच्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो माजी विद्यार्थी एकत्र येण्यासाठी गेले अनेक महिने नियोजन करत आहेत. कित्येक वर्षांनी आपल्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता माजी विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. 28, 29 डिसेंबर 2019 रोजी शतक महोत्सवाचा शानदार सोहळा होणार असल्याचे शाळेच्या व्यवस्थापनातर्फे सांगितले.
कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बोलताना व्यवस्थापनाने सांगितले की, राज्याच्या आणि देशाच्या विविध कोपर्यात असणार्या विद्यार्थ्यांना या सोहळ्यात आमंत्रित करणे सुलभ जावे या उद्देशाने आम्ही वेबपेजच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या पेजवरील लिंक वापरून माजी विद्यार्थी त्यांचे नोंदणी शुल्क थेट संस्थेच्या खात्यावर जमा करू शकेल. माजी विद्यार्थ्यांना 20 डिसेंबर पर्यंत रुपये एक हजार इतके नोंदणी शुल्क असेल, तर त्यानंतर रुपये दीड हजार इतके नोंदणी शुल्क राहणार आहे. या सोहळ्यासाठी ऐच्छिक स्वरूपात मानद नोंदणी देखील करता येईल त्यासाठी रुपये 11 हजार इतके नोंदणी शुल्क असेल. साधारणपणे पाच हजार माजी विद्यार्थी यानिमित्ताने एकत्र येतील अशी अपेक्षा आहे. शतक महोत्सवाच्या नियोजनाच्या बैठकीत शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. गिरीश गुणे, मंगेश परुळेकर, अॅड. जगदीश घरत, मंदार नाडगौंडी, संतोष घोडींदे, गणेश कडू, दीपक मानकामे आदी उपस्थित होते.