दोन सीटसाठी नव्याने बांधकाम सुरू
पोलादपूर : प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील खुर्द येथे चार सीटऐवजी केवळ दोन सीटचे शौचालय बांधून कामाच्या बिलापोटीची सर्व रक्कम दोष निवारण कालावधी संपुष्टात येण्यापूर्वीच काढण्यात आल्याच्या गैरव्यवहाराकडे तत्कालीन गटविकास अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार हेमंत युवराज भोईटे यांनी विद्यमान गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांच्याकडे केली होती. त्याचे वृत्त 2 फेबु्रवारी रोजी दै. ‘राम प्रहर‘मध्ये प्रसिद्ध होताच पोलादपूर पंचायत समिती प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि ग्रामपंचायतीची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळे शौचालयाच्या उर्वरित दोन सीटसाठी नव्याने बांधकाम सुरू झाले आहे.
केंद्र सरकारच्या ’स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पोलादपूर तालुक्यातील आडावळे खुर्द गावात शौचालय उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देणार्या पत्रामध्ये कामाच्या ठिकाणी नामफलक लावून त्यावर योजनेचे नाव, कामाची अंदाजपत्रकीय किंमत, काम सुरू केल्याचा दिनांक व काम पूर्ण होण्याचा कालावधी, कंत्राटदाराचे नाव व ठिकाण नमूद करून गटविकास अधिकार्यांनी ही कामे पंचायत समिती स्तरावर पूर्ण करून घ्यायची असल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, मात्र आडावळे बुद्रुक ग्रामपंचायती अंतर्गत आडावळे खुर्द येथे केवळ दोन सीटचे शौचालय बांधून त्यावर चार सीटचे शौचालय असल्याच्या उल्लेखासह सर्व मुद्दे लिहून बिलापोटी रक्कम काढण्याच्या गैरव्यवहाराकडे तत्कालीन गटविकास अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार विद्यमान गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारदार हेमंत युवराज भोईटे यांनी केली.
यानंतर पोलादपूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने तसेच गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी या प्रकरणी दखल घेऊन ग्रामपंचायत आडावळे बुद्रुक यांना संबंधित ठेकेदाराकडून चार सीटचे शौचालय बांधून पूर्ण न केल्यास कारवाईचे संकेत दिल्याने या कामाने तातडीने वेग घेतला आहे.