Breaking News

खंडाळा घाटातील दुरुस्तीसाठी अनेक मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द, रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल

कर्जत : बातमीदार

मुंबई-पुणे या मेन लाईनवरील खंडाळा घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दुरुस्तीची कामे  हाती घेतली आहेत. त्या कामामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले असून प्रवाशांचे मेगा हाल सुरू आहेत. रेल्वेने अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याने प्रवासी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे मागील काही महिन्यांपासून खंडाळा घाट सेक्शनची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने दीड महिन्यापासून खंडाळा घाट सेक्शनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे, ते पुढील सुमारे चार ते पाच महिने सुरू राहणार आहे. या  दुरुस्तीच्या कामात अडथळा न येण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत, तर काहींचे मार्ग बदलेले आहेत, मात्र हे करताना रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीकरिता काहीच पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, भुसावळ, नांदेड, हुबळी, पनवेल, मुंबई इत्यादी दिशेकडून येणार्‍या आणि जाणार्‍या प्रवाशांचे मेगाहाल होत आहेत.

रेल्वे प्रशासनाने कर्जत-पनवेल मार्गावरील सर्वच गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक या बंद काळात रेल्वे प्रशासनाने पनवेल मार्गे येणार्‍या आणि जाणार्‍या मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत कर्जत-पनवेल शटल सेवा सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज होती. डेक्कन क्विन आणि इंटसिटी एक्स्प्रेस या गाड्यांना कर्जत रेल्वे स्थानकात तात्पुरता थांबा देणे गरजेचे होते, मात्र मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेसह प्रवासाची कुठल्याही प्रकारे काळजी घेत नाही, असे दिसून आले आहे. प्रवाशांची वाढती गैरसोय व ससेहोलपट लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हिताची पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा भविष्यात प्रवाशांच्या उद्रेकास सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कर्जत, बदलापूर,  लोणावळा येथील प्रवासी संघटना एकत्र येत आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply