Breaking News

वाळीत विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, उंबरगावमधील घटनेने खळबळ

पाली : प्रतिनिधी

गावाने वाळीत टाकलेल्या निवृत्त पोलीस कर्मचार्‍याच्या विवाहित मुलीने विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्यावर योग्य वेळी उपचार झाल्याने या तीन मुलांच्या आईचा जीव वाचला आहे. पिंकी संदीप मांगे (वय 29, रा. उंबरगाव, ता. सुधागड) असे या विवाहितेचेे नाव आहे.

नागोठणे पोलीस ठाण्यातून निवृत्त झाल्यानंतर हशा नामा हंभीर हे आपल्या मूळगावी सुधागड तालुक्यातील उंबरगाव या आदिवासी वाडीवर राहत आहेत, मात्र त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला गाव पंचांनी गेल्या दीड वर्षांपासून वाळीत टाकले आहे. त्यामुळे गावातील कोणीही व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांशी बोलत नाहीत, संबंध ठेवीत नाहीत, सुख-दुःखात त्यांच्याकडे येत नाहीत. त्याबाबत निवृत्त पोलीस कर्मचारी हशा हंभीर यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे चौकशी करून न्याय मिळावा, यासाठी अर्ज केला आहे.

दरम्यान, हशा नामा हंभीर यांची मुलगी पिंकी हिचे गावातील मंगेश मांगे यांच्याशी लग्न झाले असून त्यांना तीन मुले आहेत. उदरनिर्वाहासाठी पिंकीने गावात छोटेसे दुकान टाकले आहे, मात्र आई-वडिलांना वाळीत टाकले असल्याने पिंकी यांच्या दुकानातही कोणी ग्रामस्थ येत नाहीत. पिंकी यांची मुले सोमवारी (दि. 4) खेळण्यासाठी गेली असता गावातील इतर मुलांनी त्यांच्याबरोबर खेळण्यास नकार दिला. तुम्ही आमच्याबरोबर खेळायला आलात, तर आमच्या पालकांना पाचशे रुपये दंड पडेल, असे अन्य मुलांनी पिंकी यांच्या मुलांना सांगितले. ते ऐकल्यावर पिंकी यांनी घरातील फिनेल पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, मात्र घरच्या लोकांनी तातडीने त्यांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्वरित उपचार करून तिचे प्राण वाचविले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply