पनवेल : वार्ताहर
पनवेलजवळील कळंबोली येथे असलेल्या मॅकडोनल्डच्या समोरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचा गराडा पडलेला असून यामुळे येथून वाहन चालविताना मोठे जिकिरीचे बनले असून यातूनच एखाद्या दिवशी मोठा अपघात घडून नाहक प्रवासी या गाड्यांखाली चिरडले जाण्याची शक्यता असताना सुद्धा वाहतूक शाखा याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याबाबत प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कळंबोली येथील मॅकडोनल्ड समोरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात घाट माथ्यावर तसेच कोकणात जाणार्या खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या असतात. यामध्ये लक्झरी बसेस तसेच चार चाकी वाहनांचा समावेश आहे. ग्राहक मिळविण्यासाठी ते भर रस्त्यात आपली गाडी उभी करून जायच्या ठिकाणच्या गावांचा आरडाओरडा करीत असतात. यामुळे प्रवाशी या गाड्या पकडण्यासाठी धावपळ करीत असतो. याच महामार्गावरुन भरधाव वेगाने एक्सप्रेस तसेच पनवेल बाजूकडे जाणार्या गाड्या जात असतात. या खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या रस्त्यातच उभ्या करत असल्याने अनेक वेळा प्रवाशांना हे लक्षात येत नाही व यातूनच प्रवाशांना वाहन धडकेचे प्रकार घडतात. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी नाहक प्रवाशांचा जीव गेला आहे. सदर बस थांबा अनधिकृत असतानाही कळंबोली वाहतूक शाखा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याबद्दल प्रवाशी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात विविध सामाजिक संस्था संघटनांनी संबंधित वाहतूक शाखेकडे येथे वाहने उभी करून देवू नयेत याबाबतच्या तक्रारी करून सुद्धा काही दिवस फक्त वाहतूक पोलीस ठेवण्यात येतो. ऐन सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात ही खाजगी ट्रॅव्हल्सची वाहने रस्ता अडवून उभी असतात. त्यामुळे पादचार्यांसह प्रवाशी व इतर वाहनांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या प्रश्नाकडे संबंधित वाहतूक शाखेने त्वरित लक्ष घालून बेकायदेशीररित्या उभा करण्यात आलेला बस थांबा तातडीने बंद करावा व या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारावा अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहे. अन्यथा संबंधित प्रवाशी व संघटना वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे समजते.