नौदल प्रमुखांचा इशारा
नवी दिल्ली ः समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होऊ शकतो. समुद्रातून दहशतवादी कारवाया करण्यासाठी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असा इशारा भारताचे नौदलप्रमुख सुनील लांबा यांनी मंगळवारी दिला. दिल्लीमध्ये इंडो-पॅसिफिकच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुलवामा दहशतवादी हल्ला कट्टरपंथीयांनी घडवून आणला. त्यांना अधिकृत यंत्रणांची मदत होती. भारताला अस्थिर करण्याचा हेतू त्यामागे होता, असे सुनील लांबा म्हणाले.
समुद्रमार्गे, तसेच अन्य प्रकारे अतिरेकी कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची आमच्याकडे माहिती आहे, असे सुनील लांबा म्हणाले. समुद्रातून आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर 26/11 हल्ला घडवून आणला. मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी एका मासेमारी बोटीचे अपहरण केले होते. मागच्या काही वर्षात इंडो-पॅसफिक क्षेत्राने दहशतवादाची वेगवेगळी रूपे पाहिली. या क्षेत्रातील फक्त काही देश दहशतवादापासून वाचले आहेत. भारत दहशतवादाची गंभीर झळ सोसत आहे, असे ते म्हणाले. तीन आठवड्यापूर्वी आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये भयानक दहशतवादी हल्ला पाहिला. भारताला अस्थिर करण्याच्या हेतूने अधिकृत यंत्रणांच्या मदतीने हा दहशतवादी हल्ला घडवण्यात आला होता, असे नौदल प्रमुखांनी सांगितले. त्यांनी नाव न घेता या वेळी पाकिस्तानवर निशाणा साधला.