Breaking News

कायदा आणि सुव्यस्थेचे पालन करावे -प्रांताधिकारी इनामदार

महाड : प्रतिनिधी

 सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या जागेसंबधीच्या खटल्याचा निकाल येत्या कांही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे. या निकालाचा सन्मान करुन त्याचे पालन करावे, असे प्रतिपादन महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले.

 महाड प्रांताधिकारी कार्यालयामध्ये शांतता कमेटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या अयोध्या रामजन्मभुमी आणि बाबरी मशिद वादग्रस्त जमीनी प्रकरणाची अंतिम सुनावणी पुर्ण झाली असून, येत्या काही दिवसात अतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल लागल्यानंतर वाद्य वाजवणे, मिरवणुका काढणे, घोषणा देणे, गुलाल उधळणे, सोशल मिडीयावरुन मत प्रदर्शन करणे तसेच आक्षेपार्ह मजकुर प्रसिध्द करणे या विरोधांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे इनामदार यांनी यावेळी सांगितले.

अवकाळी पावसामुळे ज्या शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, अशा बाधीत शेतकर्‍यांनी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार चंद्रसेन पवार यांनी या बैठकीत केले.या बैठकीला भाजपचे जिल्हा चिटणीस बिपीन महामुणकर, तालुका अध्यक्ष जयंवत दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य इब्राहिम झमाने, दलित मित्र मधुकर गायकवाड, तहसिलदार इंद्रसेन पवार, पोलादपुरच्या तहसिलदार श्रीमती देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, पोलीस निरिक्षक गवारी, सहायक निरिक्षक गिरी यांच्यासह शांतता कमेटीचे सदस्य, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, व्यापारी, नागरिक, पत्रकार उपस्थित होते.

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply