खेड, चिपळूण : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांना पूर येऊन चिपळूण आणि खेडमध्ये सोमवारी (दि. 15) पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला. याशिवाय दापोली मार्गही जलमय झाल्याने बंद करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सुरू असलेला पाऊस आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जगबुडी व वाशिष्ठी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी नदीने सोमवारी धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेत आणि घरांमध्ये पाणी शिरले; तर वाशिष्ठीचे पाणी घुसून चिपळूणचे जनजीवन विस्कळीत झाले. पाण्याखाली गेलेला मुंबई-गोवा महामार्ग आणि दापोली मार्ग बंद ठेवण्यात आला होता. तेथे सुरक्षारक्षक आणि पोलीस तैनात होते.
मुसळधार पावसामुळे सह्याद्री खोर्यातील 32 गावांचा संपर्क तुटला असून, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुसरीकडे परशुराम घाटात दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती.