पेण : प्रतिनिधी
शहरातील म्हाडा कॉलनीत बुधवारी (दि. 6) पिसाळलेल्या गाईने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या गाईने दिवसभरात एका महिलेसह अनेक जणांना जखमी केले. या घटनेमुळे शहरातील भुंडा पूल ते म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या गाईला पकडण्यात लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र मंडळाच्या सदस्यांना यश आले. या गाईला पकडण्यासाठी नगरसेविका अर्पिता कुंभार यांचे पती अमित कुंभार यांनी आपल्या मित्रांसह पशु वैद्यकीय अधिकारी व पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलांना पाचारण केले. मात्र त्यांना गाईला पकडण्यात यश आले नाही. पेण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवार यांनीही गाईला पकडण्याचे प्रयत्न केले. शेवटी येथील प्राणी मित्रांनी लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र मंडळाच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. शिवदुर्ग मित्र मंडळाच्या सदस्यांना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गाईला पकडण्यात यश आले व दिवसभर चाललेले हे थरारनाट्य संपले.